INDvsWI : हा गोलंदाज म्हणाला, कोहली-धोनीमुळे माझा खेळ सुधारला..!

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

''माझ्या पहिल्या सामन्यात मला धोनी भाईने फलंदाजाच्या पायाच्या हालचालींकडे लक्ष देऊन गोलंदाजीत बदल करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यामुळे माझ्या खेळाने वेगळी उंची गाठली.''

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेल्या हैदराबादच्या महंमद सिराजचा प्रवास अगदी स्वप्नवत आहे. सामन्यागणिक प्रगती करत असलेल्या या खेळाडूने आपल्या प्रगतीचे सर्व श्रेय भारतीय संघाचे दोन आधारस्तंभ असलेल्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीला दिले आहे.

सिराजने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी त्याच्या खेळात झालेल्या सुधारणेचे सर्व श्रेय कोहली आणि धोनीला दिले आहे. त्यांनी दिलेल्या अनुभवाच्या बोलांमुळे त्याच्या खेळात प्रगती झाल्याचेही त्याने मान्य केले.

''ट्वेंटी20 संघात माझी निवड झाल्यावर मला दडपण आले होते आणि म्हणून मी कोहली भाईशी संवाद साधला. तेव्हा त्याने मला दडपण घेऊ नको, आपण मैदानावर बोलू, फक्त खेळण्यासाठी तयार रहा, असा सल्ला दिला. तर मी मैदानात गेल्यावर मला माझ्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची मुभाही दिली,'' असे सांगत त्याने कोहलीचे कौतुक केले. 

पदार्पणात धोनीने त्याला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''माझ्या पहिल्या सामन्यात मला धोनी भाईने फलंदाजाच्या पायाच्या हालचालींकडे लक्ष देऊन गोलंदाजीत बदल करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यामुळे माझ्या खेळाने वेगळी उंची गाठली.''

भारताचे प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमरा यांच्या अनुपस्थितीत सिराजला अंतिम संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.    

रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या महंमदने त्याच्या अवघ्या दुसऱ्या रणजी करंडकात हैदराबादकडून सर्वाधिक बळी मिळविण्याचा मान पटकावला आणि त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्याने नऊ सामन्यांमध्ये 41 बळी घेत आपला ठसा उमटविला. त्यानंतर काही महिन्यातच सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्यासोबत घसघशीत 2.6 करोड रकमेचा करार केला. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांत त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय संघात पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला अजूनही उत्तम कामगिरी करता आलेली नाही. त्याने तीन ट्वेंटी20 सामन्यंमध्ये फक्त तीन बळी घेतले आहेत. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाल्याने आता मात्र त्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. भारत अ संघाकडून खेळताना नुकतेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच डावात 59 धावा देत 8 बळी घेतले. 

संबंधित बातम्या