Asia Cup 2018 : धोनी हाच 'बॉस'; आणखी एकदा शिक्कामोर्तब!

वृत्तसंस्था
Saturday, 29 September 2018

त्याने यष्टींमागे 800 बळी मिळवत आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 800 बळी मिळवणारा तो आशिया खंडातील एकमेव यष्टीरक्षक ठरला आहे. 

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीतील स्फोटकपणा कमी झाला असला तरीही आजही यष्टीरक्षणात त्याची सर कोणालाही येणार नाही. आशिया करंडकाच्या अंतिम सामन्यात धोनीने यष्टीरक्षणात आणखी एक विक्रम केला आहे. त्याने यष्टींमागे 800 बळी मिळवत आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 800 बळी मिळवणारा तो आशिया खंडातील एकमेव यष्टीरक्षक ठरला आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला यष्टींमागचा 800 वा बळी मिळवला. या सामन्यात धोनीने सलामीवीर लिटॉन दास आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा यांना यष्टीचित करत आपले 800 बळी पूर्ण केले. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी आता तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये 998 बळींसह दक्षिण आफ्रिकेचे माजी यष्टीरक्षक मार्क बाऊचर पहिल्या स्थानावर आहेत तर, 905 बळींसह ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानावर आहे. 

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या सलामीवीरांनी चांगली सुरवात केली मात्र पहिला फलंदाज बाद झाल्यावर बांगलादेशच्या डावाला खिंडार पडले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या पवित्र्यात असलेल्या बांगलादेशी कर्णधार मश्रफी मुर्तझाला धोनीने चपळाईने यष्टीचित करुन 800 वा बळी घेतला. त्याच्या या चपळाईचा व्हिडीओ सोशल  मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

संबंधित बातम्या