World Cup 2019 : इंग्लंडमधील वातावरण, हवामान सगळेच भारतास अनुकूल : मायकेल वॉन

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या कालावधीत क्रिकेट वातावरण आणि त्यासाठी हवामान सगळेच उपखंडातील पर्यायाने भारतीय संघासाठी अनुकूल असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर होण्यास सुरवात झाल्यावर क्रिकेट पंडित आपले अंदाज बांधू लागले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने यात सर्वात प्रथम उडी घेतली असून, विश्‍वकरंडक स्पर्धेच्या कालावधीत क्रिकेट वातावरण आणि त्यासाठी हवामान सगळेच उपखंडातील पर्यायाने भारतीय संघासाठी अनुकूल असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

वॉन याने आपला मुद्दा ठळकपणे मांडताना इंग्लंडमध्ये झालेल्या दोन चॅंपियन्स स्पर्धेचा हवाला दिला आहे. "इंग्लंडमध्ये झालेल्या गेल्या दोन चॅंपियन्स लीग स्पर्धेत उपखंडातील संघांचे वर्चस्व राहिले आहे. एक स्पर्धा भारताने, तर दुसरी पाकिस्तानने जिंकली आहे,' असे वॉनने म्हटले आहे. त्याचवेळी अशा हवामानात इंग्लंडमध्ये विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याच्या निर्णयासही त्याने आव्हान दिले आहे. "दरवर्षी या मे-जून महिन्याच्या कालावधीत येथे ऊन चांगले असते. त्यामुळे खेळपट्ट्या कायम कोरड्या राहतात आणि पर्यायाने फिरकीस मोठी साथ मिळते, असे वॉनचे म्हणणे आहे. 

गेल्या दशकातील या महिन्यातील हवामान बघता वॉनच्या टीकेला पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी 1999 मध्ये येथे एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धा झाली होती, तेव्हा खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या ठरल्या होत्या. तेव्हा ग्लेन मॅग्रा आणि न्यूझीलंडच्या पॉल ऍलॉट अशा गोलंदाजांनी कमाल केली होती. 

वॉनने हाच धागा पकडून सोमवारी जाहीर झालेल्या भारतीय संघाचे स्वागत केले आहे. भारताने 15 सदस्यीय संघात तीन फिरकी गोलंदाजांना दिलेली संधी नक्कीच त्यांची स्पर्धेतील ताकद वाढविणारी असेल, असे वॉन याने सांगितले. कुलदीप, युझवेंद्र, जडेजा यांच्या बरोबरीने केदार जाधव हा बदली फिरकी गोलंदाज भारतासाठी महत्त्वाचा ठरेल, असा अंदाजही त्याने व्यक्त केला. 
 
इंग्लंडमधील सध्याचे हवामान थंड असले, तरी स्पर्धेच्या कालावधीत ते बदलण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी या कालावधीत येतील हवमान सर्वाधिक उष्ण होते. अशा परिस्थितीत उपखंडातील संघांना फायदा होईल, हवामान थंड राहिल्यास इंग्लंडला संधी असेल. 
-केविन पीटरसन, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू 

संबंधित बातम्या