भारत-विंडीज वन-डेच्या आयोजनास नकार 

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

"बीसीसीआय' पदाधिकाऱ्याने या नकाराचे आपल्याला वेगळेच कारण दिसून येत असल्याचे म्हटले आहे. हा पदाधिकारी म्हणतो, ""भारताच्या 2017 मधील विंडीज दौऱ्यात कनमाडीकर यांना भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक व्हायचे होते. मात्र, प्रशासक समितीने त्यास नकार दिला. ती घटना कनमाडीकर विसरले नसावेत, म्हणून त्याचा बदला ते या पद्धतीने घेत असावेत.'' 

इंदौर : मध्य प्रदेश क्रिकेट संघटना (एमपीसीए) आणि प्रशासक समिती यांच्यातील कॉंप्लिमेंटरी तिकिटांचा वाद चिघळल्याने इंदौरच्या क्रिकेट चाहत्यांना भारत- वेस्ट इंडीज दरम्यान होणारा दुसरा एकदिवसीय सामना पाहण्यास मुकावे लागणार आहे. "एमपीसीए'ने या वादावरून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. 

कॉंप्लिमेंटरी तिकिटांबाबत तीन ई-मेल पाठवूनही प्रशासक समितीने त्यास उत्तर न दिल्यामुळे "एमपीसीए'ने थेट सामन्याचे आयोजन करण्यासच नकार दिला आहे. "बीसीसीआय' घटनेनुसार असलेल्या मोफत तिकिटांखेरीज अधिक तिकिटांची मागणी करत आहे आणि स्टेडियमची क्षमता लक्षात घेता आम्हाला ते शक्‍य नसल्याने आम्ही या सामन्याचे आयोजन करू शकत नाही, असे "एमपीसीए'चे सह सचिव मिलिंद कनमाडीकर यांनी सांगितले. "एमपीसीए'ने तशी कल्पना "बीसीसीआय'लादेखील दिली असल्यामुळे आता मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे अन्यत्र आयोजन होऊ शकते. 

"बीसीसीआय' पदाधिकाऱ्याने "एमपीसीए' आम्हाला ब्लॅकमेल करत असल्याचे म्हटले आहे. "बीसीसीआय'चा हा पदाधिकारी म्हणाला, ""आम्हाला सामना इंदौरहून दुसरीकडे हलवायचा नाही. पण, जर सामना आयोजित करण्यास त्यांचा नकारच असेल, तर आम्हाला दुसऱ्या केंद्राचा विचार करावा लागेल. कॉंप्लिमेंटरी तिकिटांचा वाद प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेस असतो. या वेळी कनमाडीकर आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत.'' 

"बीसीसीआय' पदाधिकाऱ्याने या नकाराचे आपल्याला वेगळेच कारण दिसून येत असल्याचे म्हटले आहे. हा पदाधिकारी म्हणतो, ""भारताच्या 2017 मधील विंडीज दौऱ्यात कनमाडीकर यांना भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक व्हायचे होते. मात्र, प्रशासक समितीने त्यास नकार दिला. ती घटना कनमाडीकर विसरले नसावेत, म्हणून त्याचा बदला ते या पद्धतीने घेत असावेत.'' 

कॉंप्लिमेंटरी तिकिटांचा नेमका वाद काय 
"बीसीसीआय'च्या घटनेनुसार स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या केवळ 10 टक्के कॉंप्लिमेंटरी तिकिटे राज्य संघटनेसाठी शिल्लक राहतात. त्यानुसार होळकर स्टेडियमची क्षमता 27 हजार इतकी आहे. तेव्हा "एमपीसीए'कडे 2700 कॉंप्लिमेंटरी तिकिटे उरतात. यातूनही "बीसीसीआय'ने आपल्या विविध पुरस्कर्त्यांसाठी अधिक 5 टक्के कॉंप्लिमेंटरी तिकिटांची मागणी केली आहे. "एमपीसीए'कडे पॅव्हेलियनची केवळ 7 हजार तिकिटे आहेत. यातील दहा टक्के गेल्यावर "एमपीसीए'कडे 700 तिकिटे उरतात आणि यातील पाच टक्के "बीसीसीआय'ला दिल्यास त्यांच्याकडे केवळ 350 तिकिटे उतरतात. आमच्या संघटनेचा आवाका लक्षात घेता ही तिकिटे कमी आहेत, त्यामुळेच "एमपीसीए' कॉंप्लिमेंटरी तिकिटांमध्ये तडजोड करण्यास तयार नाही. 

संबंधित बातम्या