बिशप प्रशाला कॅम्पकडून सेंट पॅट्रिकला पराभवाचा धक्का 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 October 2018

एक्‍स लॉयला ऍल्युमनी नेटवर्क (इलान) आयोजित लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात बिशप प्रशाला कॅम्प संघाने सेंट पॅट्रिक प्रशालेचा 4-0 असा सरळ पराभव केला.

पुणे : एक्‍स लॉयला ऍल्युमनी नेटवर्क (इलान) आयोजित लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात बिशप प्रशाला कॅम्प संघाने सेंट पॅट्रिक प्रशालेचा 4-0 असा सरळ पराभव केला. अन्य लढतीत विद्याभवन, एसएसपीएमएस बोर्डिंग आणि सेंट व्हिन्सेंट प्रशालेने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. पाषाण येथील लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बारा वर्षांखालील गटातील 

बिशप आणि सेंट पॅट्रिक या सामन्यात बिशपच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. त्यांच्या खेळाडूंनी पहिल्या बारा मिनिटांतच तीन गोल केले होते. त्यांच्या अथर्व अब्राहमने चौथ्याच मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडल्यानंतर एरिक ऍरनाल्डने दहाव्या मिनिटास दुसरा गोल केल्यानंतर अथर्व अब्राहमने बाराव्या मिनिटास तिसरा गोल केला. उत्तरार्धात वेद सरकारने 38 व्या मिनिटास चौथा व विजयी गोल केला. 
चौदा वर्षांखालील गटात विद्याभवनने सेंट पॅट्रिक प्रशालेचा 2-0 असा सरळ पराभव केला. विद्याभवनच्या हर्ष धुमाळने आठव्याच मिनिटास गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेंट पॅट्रिकच्या खेळाडूंनी गोल करण्याचे केलेले प्रयत्न अपुरे ठरले. मध्यंतरास विद्याभवनकडे एक गोलची आघाडी कायम होती. उत्तरार्धात क्षितिज कोकाटेने 32 व्या मिनिटास गोल करून संघाला 2-0 अशा आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कायम ठेवत विद्याभवनने विजयावर शिक्कामोर्तब केले. 

सोळा वर्षांखालील गटात एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशालेने सेंट पॅट्रिक प्रशालेचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी प्रथमपासूनच वेगवान खेळाचे धोरण स्वीकारले; परंतु 
मिळालेल्या संधीवर ते गोल करण्यात मात्र अपयशी ठरल्याने पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. 

उत्तरार्धात एसएसपीएमएसच्या आशिष म्हात्रेने 33 व्या मिनिटास गोल करून संघाला आघाडी मिळवून दिल्यानंतर अभिषेकसिंगने 37 व्या मिनिटास दुसरा गोल केला. सेंट पॅट्रिक प्रशालेच्या 
ग्लॅडसन डेव्हिडने 42 व्या मिनिटास गोल करून आघाडी 2-1ने कमी करून सामन्यात चुरस निर्माण केली. खेळाच्या 55 व्या मिनिटास तनय गिरीधरने तिसरा व विजयी गोल केला. 

अमीर ऍडमने हॅटट्रिकसह केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट प्रशालेने बिशप प्रशाला कॅम्पचा चार गोलने पराभव केला. या सामन्यात पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. उत्तरार्धात त्यांच्या खेळाडूंनी अकरा मिनिटांतच चार गोल केले. या वेळी अमीर ऍडमनमे (48, 53 व 55 वे मिनीट) 
हॅटट्रिकसह तीन गोल केले. फाझलने 59 व्या मिनिटास चौथा गोल केला. 
या स्पर्धेत चार सामन्यांत मिळून 14 गोल नोंदविले गेले. 
 

संबंधित बातम्या