लक्ष्य सेनची  उपांत्यपूर्व फेरीत धडक 

वृत्तसंस्था
Saturday, 17 November 2018

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 
लक्ष्यने तैवानच्या चेन शिआऊ चेंग याचा 15-21, 21-17, 21-14 असा पराभव केला.

मार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 
लक्ष्यने तैवानच्या चेन शिआऊ चेंग याचा 15-21, 21-17, 21-14 असा पराभव केला. लक्ष्यने याच वर्षी कुमार गटाच्या आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. लक्ष्यची गाठ आता मलेशियाच्या एदिल शोलेह अली सदिकीन याच्याशी पडेल. हा अडथळा पार केल्यास त्याचे जागतिक स्पर्धेतील पदक निश्‍चित होईल. 

लक्ष्यप्रमाणेच विष्णूवर्धन गौड पंजला-श्रीकृष्ण साई कुमार पोडिले या जोडीनेही दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या द्विकी राफिआन रेस्तू आणि बर्नाड्‌स बगास कुसुमा वर्दाना जोडीचा 21-11, 21-17 असा पराभव केला. भारतीय जोडीची गाठ आता कोरियाच्या ताए यंग शिन-चॅन वॅंग जोडीशी पडणार आहे. 
दरम्यान, अन्य स्पर्धकांमध्ये प्रियांशू राजावत, आलाप मिश्रा, किरण जॉर्ज यांचे एकेरीतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. मुलींच्या गटात मालविका बनसोड पहिल्या, तर गायत्री गोपीचंद दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्या. आठवे मानांकन मिळालेल्या पूर्वा बर्वेला पहिल्या फेरीत "बाय' मिळाला. मात्र, तिसऱ्या फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक कुमार बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी साईना नेहवाल ही एकमेव खेळाडू आहे, तिने 2008 मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती. 
 

संबंधित बातम्या