IPL 2019 : केकेआर अब नही मानेगा हार; आखरी दम तक, आखरी रन तक

मुकुंद पोतदार
Monday, 18 March 2019

हम है कोलकाता के रायडर
बादशाह के बाजीगर
हमे ना किसीसे कोई डर
आयपीएल के बनेंगे लिडर

हम है कोलकाता के रायडर
बादशाह के बाजीगर
हमे ना किसीसे कोई डर
आयपीएल के बनेंगे लिडर

आयपीएल 2019 : आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सचे अर्थात केकेआरचे स्थान महत्त्वाचे आहे. 2008 मध्ये याच संघाने सलामीचा सामना गाजविला. बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरचा किवी फटकेबाज ब्रेंडन मॅकलम याने कमाल केली. त्याने केवळ 73 चेंडूंत 158 धावा झोडपल्या. 10 चौकार आणि 13 षटकार खेचताना त्याने 216.43 असा स्ट्राईक रेट राखला होता. टी-20 मध्ये प्रेक्षक चौकार-षटकार पाहायला मिळणार या खात्रीने आले होते, पण स्टेडिमवरील प्रेक्षकांसह इडियट बॉक्सवर मॅक््लमची इनिंग पाहिलेल्या क्रिकेटप्रेमींना वेड लागले. आयपीएलला अशी दणदणीत सलामी दिलेल्या केकेआरने आपला ठसा उमटविला आहे. City of Joy अर्थात कोलकात्यामधील या संघाचे चाहते असंख्य आहेत.

किंग खान अर्थात शाहरुख खान मालक आणि जुही चावला संयुक्त मालकीण असलेल्या केकेआरला त्या मोसमात आठ संघांमध्ये सहाव्या नंबरवर समाधान मानावे लागले, पण एकूण इतिहासात दोन वेळा जेतेपद जिंकून केकेआरने दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्रत्येकी तीन वेळा विजेतेपद जिंकले आहे.

केकेआरने 2012 व 2014 अशी दोन विजेतिपदे तीन मोसमांच्या कालावधीत पटकावली. याशिवाय इतर चार वेळा केकेआरने बाद फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे गेल्या सलग तीन मोसमांत केकेआरने प्ले-ऑफचा टप्पा तरी गाठला आहे. एकीकडे बाद फेरीत बाद होणे चाहत्यांसाठी निराशाजनक असले तरी दुसरीकडे कामगिरीतील सातत्य आहे हा मुद्दा विचारात घ्यावे लागेल. सातत्याच्या बाबतीत सीएसके, मुंबई इंडियन्सच्या जोडीने केकेआरने आपले स्थान निर्माण केले आहे.

कर्णधार कार्तिकवर मदार

एका दशकाची वाटचाल संपल्यानंतर किंग खानने गेल्या मोसमात संघाचा चेहरामोहरा बदलला. गौतम गंभीरसारख्या यशस्वी आणि अनुभवी कर्णधाराकडून दिनेश कार्तिक याच्याकडे सुत्रे सोपविण्यात आली. तेव्हा इतर संघाच्या हाय-प्रोफाईल कर्णधारांच्या तुलनेत कार्तिक किती छाप पाडतो याविषयी तज्ञ समालोचकांना शंका होती, तर चाहत्यांची स्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. अशावेळी कार्तिकने प्ले-ऑफमधील प्रवेशासह क्वालीफायर 2 पर्यंत मजल मारली. यात कार्तिकने 498 धावांसह फलंदाज म्हणूनही योगदान दिले. केकेआरकडून सर्वाधिक धावा त्याच्याच होत्या.

कार्तिक : अभी नही तो कभी नही

कार्तिकला या कामगिरीमुळे भारतीय संघातील पुनरागमनाचे दरवाजे खुले झाले होते. त्यामुळे तो कसोटी सामनाही खेळू शकला होता. आता कसोटी सहभागाची संधी त्याला मिळण्याची शक्यता कमी आहे, पण प्रामुख्याने वर्ल्ड कपसाठी हा मोसम त्याच्याकरीता अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. किंबहुना टीम इंडियाच्या संदर्भात अभी नही तो कभी नही अशी कार्तिकची स्थिती झाली आहे.

एक पाऊल पुढे पडणे अपेक्षित

गेल्या मोसमात अंतिम फेरी गाठता आली नसली तरी केकेआरने भविष्याच्या दृष्टिने योग्य निर्णय घेतल्याचे आणि नव्या कर्णधारासह नव्या खेळाडूंमध्ये केलेली गुंतवणूक रिटर्न देणारी असल्याचे स्पष्ट झाले. किंग खान संघाच्या कामगिरीविषयी, ती प्रेरणादायी ठरण्याविषयी आणि मुख्य म्हणजे प्रयत्नांत कुठेही कमी पडता कामा नये यासाठी आग्रही असतो. संघानेही सातत्य राखत त्याच्या अपेक्षा सार्थ ठरविल्या आहेत. आता एक पाऊल पुढे टाकणे आणि जेतेपद पटकावणे केकेआर चाहत्यांना अपेक्षित आहे.

नव्या दमाचे खेळाडू

यंदा केकेआरने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट याला पाच कोटी रुपयांना, तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला एक कोटी 60 लाख रुपयांना खरेदी केले. लिलावाचे वैशिष्ट्य ठरलेले हे खेळाडू संघासाठी बहुमोल खेळ करण्याची अपेक्षा आहे.

नारायण आकर्षण

आयपीएलच्या रुपाने टी-20 क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळाले. त्यात फिरकी गोलंदाज किती चालतील याविषयी सर्व पातळ्यांवर प्रश्नचिन्ह होते. प्रत्यक्षात फिरकी गोलंदाजांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. याची मुख्य उदाहरणे द्यायची झाली तर केकेआरच्या सुनील नारायणचे नाव सर्वप्रथम घेणे उचित ठरेल. विशेष म्हणजे हा बहाद्दर फलंदाजीतही दमदार योगदान देऊ लागला आहे. कुलदीप यादवची गेल्या मोसमापासूनची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी पाहिल्यास त्याची नारायणशी कशी जोडी जमते आणि ती कशी फोडायची याचा होमवर्क प्रतिस्पर्ध्यांना करावा लागेल.

उथप्पाकडे लक्ष

कर्नाटकचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू रॉबिन उथप्पा केकेआरचा प्रमुख मोहरा राहिला आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपद आहे. 2014 ते 18 दरम्यान त्याने केकेआरसाठी 2157 धावा काढल्या आहेत. आयपीएलमधील त्याची एकूण कामगिरी 165 सामन्यांत 4129 धावा (131.70 स्ट्राईक रेट, 23 अर्धशतके) अशी आहे.

दोन मानकरी नसणार

भारताच्या युवा जगज्जेतेपदात मोलाचा वाटा उचलेला वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी हे दोघे दुखापतींमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे संदीप वॅरीयर आणि के. सी. करीअप्पा यांना पाचारण करण्यात आले आहे. केकेआरचा नवा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे. त्यात किंग खान म्हणतो की केकेआर है तैय्यार.

गेल्या मोसमापासून केलेली संघाची फेररचना पाहता केकेआर या मोसमासाठी आणखी तयारी करून सज्ज झाला आहे यात शंका नाही. संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत हा संघ मुख्य दावेदार असेल हे नक्की.

संघ :
रिटेन केलेले खेळाडू : दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शुबमन गील, पियुष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, शिवम मावी, नितीश राणा, रिंकू सिंग, कमलेश नागरकोटी (नंतर दुखापतीमुळे माघार)
रिलीज केलेले खेळाडू ः मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन, टॉम करन, कॅमेरॉन डेल्पोर्ट, इशांक जग्गी, विनय कुमार, अपूर्व वानखडे, जॅव्हॉन सिअर्लेस

लिलावात खरेदी केलेले खेळाडू : 
कार्लोस ब्रॅथवेट (5 कोटी), लॉकी फर्ग्युसन (एक कोटी 60 लाख), अॅन्रीच नॉर्तये 20 लाख), निखील नाईक (20 लाख), हॅरी गर्नी (75 लाख), पृथ्वी राज (20 लाख), ज्यो डेन्ली (1 कोटी), श्रीकांत मुंढे (20 लाख), 

मोसमागणिक कामगिरी
2008 -6
2009 - 8
2010 - 6
2011 - एलिमीनीटेर (मुंबई इंडियन्सची केकेआरवर चार विकेट-चार चेंडू राखून मात)
2012 - विजेते
2013 - 7
2014 - विजेते
2015 - 5
2016 - एलिमीनीटेर (सनरायझर्स हैदराबादकडून 22 धावांनी पराभूत)
2017 - क्वालीफायर 2 (मुंबई इंडियन्सची केकेआरवर 6 विकेट-33 चेंडू राखून मात, त्याआधी एलिमीनीटेरमध्ये केकेआरची सनरायझर्सवर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार सात विकेट-चार चेंडू राखून मात)
2018 - क्वालीफायर 2 (सनरायझर्सविरुद्ध 14 धावांनी पराभूत, त्याआधी एलिमीनीटेरमध्ये राजस्थान रॉयल्सवर 25 धावांनी मात)

केकेआरची एकूण कामगिरी
सामने - 164
विजय - 86
पराभव - 76
टाय- 2
यशाची टक्केवारी - 53.04

- गोलंदाजीत सुनील नारायण सर्वाधिक यशस्वी
- 2012 ते 2018 दरम्यानची कामगिरी ः 98 सामने-97 डाव-381.5 षटके-2 मेडन-2498 धावा-112 विकेट-सर्वोत्तम 19 धावांत 5-22.30 अॅव्हरेज-6.54 इकॉनॉमी रेट-20.4 स्ट्राईक रेट-6 वेळा 4 विकेटची कामगिरी
- दुसऱ्या क्रमांकावर पियुष चावला (57 सामन्यांत 56 विकेट)
- उमेश यादवच्या 48, तर आंद्रे रसेलच्या 43 विकेट

फलंदाजीत नारायणच्या 48 डावांत 168.81च्या स्ट्राईक रेटने 372 चेंडूंत 628 धावा, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश. सर्वोच्च 75. एकूण चौकार 76, एकूण षटकार 35

- कर्णधार म्हणून कार्तिकची कामगिरी 16  सामने- 9 विजय-7 पराभव-56.25 टक्केवारी
- गौतम गंभीरचे 108 सामन्यांत 61, तर सौरव गांगुलीचे 27 सामन्यांत 13 विजय

संबंधित बातम्या