IPL 2019 : अश्विनच्या दोन षटकारांमुळे राजस्थानचे वाजविले की बारा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 April 2019

पंजाबने 9 सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून, 10 गुणांसह त्यांनी चौथे स्थान गाठले. राजस्थानला आठ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. 

मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या 12व्या पर्वात राजस्थान रॉयल्सला 12 धावांनी हरवीत प्लेऑफमध्ये प्रवेशाच्या आशा उंचावल्या. पंजाबचा कर्णधार आर. अश्विन याने अखेरच्या दोन चेंडूंवर धवल कुलकर्णीला दोन षटकार मारले. यामुळे राजस्थानला 12व्या पर्वात सहावा पराभव पत्करावा लागला. 

राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजी दिली. पंजाबने 6 बाद 182 अशी दमदार धावसंख्या उभारली. राजस्थानला 7 बाद 168 धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेरच्या 5 षटकांत 46 धावा करूनही राजस्थानचे प्रयत्न कमी पडले. 

पंजाबने 9 सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून, 10 गुणांसह त्यांनी चौथे स्थान गाठले. राजस्थानला आठ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. 

राजस्थानने सुरवात चांगली केली होती, पण पंजाबने मोक्‍याच्या वेळी विकेट घेतल्या. यात 16व्या षटकात आर. अश्विन याने त्रिपाठीची अर्धशतकी खेळी संपविली. एम. अश्विन याने ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍टन टर्नर याला आयपीएल पदार्पणात खातेही उघडू दिले नाही. कर्णधार रहाणेचे प्रयत्न अपुरे पडले. स्टीव स्मिथ नसल्याचाही राजस्थानला फटका बसला. 

त्याआधी पंजाबकडून राहुलने आणखी एक अर्धशतक काढले. डेव्हिड मिलर व स्वतः आर. अश्विन यांनी उपयुक्त भर घातली. यातही शेवटच्या षटकात धवल कुलकर्णीकडून आर. अश्विन याने 17 धावा वसूल केल्या. पहिल्याच चेंडूवर मिलर बाद झाला, पण अश्विनने एक चौकार व दोन षटकार मारले. मुजीब उर रेहमान चौथ्या चेंडूवर यॉर्करमुळे चकला. त्यात एक लेगबाय निघाली. मग अखेरचे दोन चेंडू अश्विनने षटकार मारले. या 12 धावांचाच फरक विजय आणि पराभवात राहिला. 

संक्षिप्त धावफलक 

किंग्ज इलेव्हन पंजाब : 20 षटकांत 6 बाद 182 (के. एल. राहुल 52-47 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, ख्रिस गेल 30-22 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, मयांक अगरवाल 26-12 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, डेव्हिड मिलर 40-27 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, आर. अश्विन 17-4 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, धवल कुलकर्णी 4-0-37-1, जयदेव उनडकट 4-0-48-1, जोफ्रा आर्चर 4-0-15-3, इश सोधी 4-0-41-1, श्रेयस गोपाल 4-0-31-0) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 7 बाद 168 (राहुल त्रिपाठी 50-45 चेंडू, 4 चौकार, जॉस बटलर 23-17 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, संजू सॅमसन 27-21 चेंडू 2 चौकार, अजिंक्‍य रहाणे 26-21 चेंडू, 1 चौकार, स्टुअर्ट बिन्नी नाबाद 31-11 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, अर्शदीप सिंग 4-0-43-2, आर. अश्विन 4-0-24-2, महंमद शमी 4-0-44-2) 
 

संबंधित बातम्या