खेलो इंडिया : खेळाडूंच्या संघर्षाची उलगडली कथा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 January 2019

गुरूचे महत्त्व 
"सपने भरे उडान' ही संकल्पना घेऊन सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरवात झाली. तेव्हापासूनच आयुष्यात घडत असताना गुरूचे महत्त्व किती असते, हा धागा पकडून संपूर्ण कार्यक्रम बांधण्यात आला होता. खेळाडू आपल्या खेळात सर्वोच्च पदावर जाण्याचे स्वप्न बघत कारकिर्दीला सुरवात करतो आणि मार्गात येणाऱ्या एकेक अडचणींवर मात करत तो आपली कारकीर्द एका उंचीवर नेऊन ठेवतो या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सुरवात केली. त्याचवेळी अशा काटेरी मार्गावरून चालत खेळात कारकीर्द घडवणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या पालकांबरोबर व्यासपीठावर स्थान देण्याच्या क्षणाने तर उपस्थित खेळाडूदेखील प्रेरित झाले. 

पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या आघाडीवरदेखील भारत मागे नाही याची साक्ष पटवून देणाऱ्या एका जबरदस्त प्रदर्शनाने "खेलो इंडिया' युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वावरील पडदा बुधवारी उघडला गेला आणि मैदानाबरोबरच भारताने आधुनिक तंत्रज्ञानात घेतलेली गरुड भरारी उपस्थित प्रेक्षकांबरोबर थेट प्रसारणाच्या माध्यमातून अवघ्या जगाने अनुभवली. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खेलो इंडियाचे उद्‌घाटन झाले. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या उद्‌घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या उद्‌घाटन सोहळ्यात अनोखे रंग भरले. क्रीडा क्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या उपस्थितीने त्याला वेगळीच झळाळी आली. 

गुरूचे महत्त्व 
"सपने भरे उडान' ही संकल्पना घेऊन सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरवात झाली. तेव्हापासूनच आयुष्यात घडत असताना गुरूचे महत्त्व किती असते, हा धागा पकडून संपूर्ण कार्यक्रम बांधण्यात आला होता. खेळाडू आपल्या खेळात सर्वोच्च पदावर जाण्याचे स्वप्न बघत कारकिर्दीला सुरवात करतो आणि मार्गात येणाऱ्या एकेक अडचणींवर मात करत तो आपली कारकीर्द एका उंचीवर नेऊन ठेवतो या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सुरवात केली. त्याचवेळी अशा काटेरी मार्गावरून चालत खेळात कारकीर्द घडवणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या पालकांबरोबर व्यासपीठावर स्थान देण्याच्या क्षणाने तर उपस्थित खेळाडूदेखील प्रेरित झाले. 

इको फ्रेंडली ज्योत 
अशा मोठ्या स्पर्धेत खेळाडूंच्या मनात अखेरपर्यंत जिद्दीने खेळण्याची भावना निर्माण करणाऱ्या ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रमही असाच वेगळा ठरला. यालाही आधुनिकेतची जोड देत ट्रॅव्हलेटर्सवरून दोन खेळाडू ज्योत घेऊन धावत संपूर्ण भारत देश धावून जातात आणि महाराष्ट्रात येऊन थांबतात. या क्षणी मोठ्या पडद्यावर ज्योत प्रज्वलित झालेली दिसते. त्याचवेळी क्रीडामंत्री राठोड यांनी खेळाडूंना "चला घडवूयात नवा भारत' ही शपथ देतात. तेव्हा तर अवघे प्रेक्षागृह उठून उभे राहते. स्पर्धेत समावेश असलेल्या खेळांचा शॅडो प्रॅक्‍टिसने दाखवलेला क्षणही असाच वेगळा होता. 

यातून घडला चॅंपियन्स 
त्यानंतर एक खेळाडू बालपणापासून अभ्यास, शाळा यामधून कसा विजेतेपदापर्यंत पोचतो, याचे सादरीकरणही अंगावर रोमांच आणि खेळाडूची संघर्षगाथा उभी करणारी ठरली. आधी पालक म्हणजे आई-वडील, पुढे जाऊन प्रशिक्षक, मेहनत आणि मैदानावरील आव्हान अशी खेळाडूच्या मार्गातील सारी आव्हाने पार करून खेळाडू मैदानात अव्वल नंबर ठरतो येथे कार्यक्रमाची सांगता होते. आधुनिकतेची कास धरत खेळाडूची ही संघर्षगाथा उलगडणाऱ्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मार्गारेट या युवतीनेच केले होते. 

तुम्ही खेळता; इतरांनाही प्रेरित करा ः राठोड 
खेळ हे एक शिक्षण आहे. ते कुठल्याही पुस्तकात मिळत नाही. ते फक्त मैदानात मिळते. तुम्ही जसे खेळता तसे इतरांनाही खेळायला प्रेरित करा असा सल्ला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी उपस्थित खेळाडूंना दिला. तंदुरुस्त आणि सशक्त भारत बनवायचा असेल, तर खेळाचे महत्त्व पटायलाच हवे. तुम्ही खेळलात, तर देश खेळणार आहे त्यामुळे उठा आणि प्रत्येकाने मैदानावर उतरून आपले योगदान द्या, असे सांगून राठोड यांनी सर्वांनाच प्रेरित केले. 

महाराष्ट्रात साकारणार क्रीडा विद्यापीठ 
या स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात औरंगाबाद येथे पहिले क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती उभी राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुका, जिल्हा आणि शहर पातळीवर देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानात अनुक्रमे 5, 15 आणि 45 कोटी इतकी वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

पंतप्रधानांचा संदेश 
खेळामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते, आव्हानाचा सामना करण्यास शिकवते त्यामुळे अभ्यासाबरोबर मैदानात उतरून खेळा, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला संदेश उद्‌घाटन सोहळ्यात वाचून दाखविण्यात आला. 

संबंधित बातम्या