Kanchenjunga Diary : अनुभव सुखद निसर्गाचा अन्‌ हवामान बदलाचाही 

उमेश झिरपे 
Monday, 8 April 2019

शनिवारी भद्रपूरला मुक्काम केल्यानंतर रविवारी रस्त्याच्या मार्गाने आमचा पुढील प्रवास सुरू झाला. रविवारी एव्हरेस्टवीर रूपेश खोपडे जॉइन झाला. कंपनीच्या कामामुळे तो आमच्याबरोबर येऊ शकला नव्हता. 

शनिवारी भद्रपूरला मुक्काम केल्यानंतर रविवारी रस्त्याच्या मार्गाने आमचा पुढील प्रवास सुरू झाला. रविवारी एव्हरेस्टवीर रूपेश खोपडे जॉइन झाला. कंपनीच्या कामामुळे तो आमच्याबरोबर येऊ शकला नव्हता. 

नेपाळच्या दक्षिण पूर्वेकडील तापलेजुंग या अतिदुर्गम जिल्ह्यामधून वाटचाल करीत आम्ही कांचनजुंगा बेसकॅम्पला पोचणार आहोत. रविवारचा आमचा प्रवास बसमधून होणार होता. बस प्रवासाचा हा शेवटचा दिवस आहे. 

सकाळी फिदीम येथील बुद्ध मंदिर आम्ही पाहिले. फिदीम सोडल्यानंतर दोन- अडीच तासांनी आम्ही इलाम गावी पोचलो. इलाम म्हणजे चहाच्या बागांचा प्रदेश. दरवर्षी हजारो पर्यटक येथे फक्त चहाच्या बागा बघायला, येथील नयनरम्य निसर्ग डोळ्यांत साठवायला येतात. आम्हीदेखील येथील निसर्गाची सुंदरता मनोमन अनुभवली. मी मागच्या वर्षी मोहिमेच्या तयारीला येथे येऊन गेलो होतो, मात्र सर्व टीम मेंबर्स पहिल्यांदाच या भागात आले आहेत. ते सुद्धा येथील निसर्ग बघून हरखून गेले. त्यांच्या डोळ्यात सुंदर निसर्ग अनुभवण्याचा आनंद मी आज घेतला. 

यानंतर आम्ही आमच्या मुक्कामाच्या गावी, म्हणजे हापूखोलाकडे रवाना झालो. हापूखोला म्हणजे नदीचे गाव. हापू हे नदीचे नाव तर खोला म्हणजे नदी. हा प्रवास जवळपास किलोमीटरचा आहे. हा संपूर्ण रस्ता डोंगरातून जाणारा, वळणावळणाचा, कधी पक्का कधी कच्चा असा आहे. एका बाजूला सतत डोंगरांची निसर्गरम्य रांग डोळे सुखावणारी होती. हे वाहनाने प्रवास करण्याचे शेवटचे गाव आहे. 

आमचा प्रवास निसर्गरम्य परिसरातून सुरू असला तरी हवामान बदलाचा परिणामही जाणवत आहे. संपूर्ण परिसरामध्ये आज ढगाळ आणि पावसाळी वातावरण आहे. सकाळपासून संपूर्ण प्रवासात आम्ही पाऊस अनुभवतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरामध्ये आलेल्या वादळामुळे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हापूखोलाच्या अलीकडे दहा किलोमीटर आम्हाला थांबावे लागले. पावसामुळे रस्ता खचला होता. त्यामुळे मिनी बस पुढे जाऊ शकणार नव्हती. त्यामुळे जीपची व्यवस्था होईपर्यंत थांबावे लागले. जीप आल्यानंतर सामान चढविले. 

आता सोमवारपासून आमचा ट्रेक सुरू करण्याचे नियोजन आहे. यंदा या परिसरात खालील भागात पाऊस, तर वर माउंटनमध्ये बर्फवृष्टी बरीच झाली आहे. हवामानात लवकरात लवकर सुधारणा होईल अशी आशा बाळगून आम्ही ट्रेक सुरू करू.

संबंधित बातम्या