इंडिया ओपन बॅडमिंटन :श्रीकांतचा जेतेपदाचा दुष्काळ कायम 

वृत्तसंस्था
Sunday, 31 March 2019

खाशाबा जाधव बंदिस्त सभागृहात श्रीकांतला प्रोत्साहित करण्यासाठी चाहत्यांनी चांगली गर्दी केली होती; पण श्रीकांतचे दिल्लीत दुसऱ्यांदा जिंकण्याचे स्वप्न उद्‌ध्वस्त झाले. त्याला 36 मिनिटे चाललेल्या निर्णायक लढतीत 7-21, 20-22 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याचा डिसेंबर 2017 पासूनचा आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. या विजयामुळे ऍक्‍सेलसेनने दुसऱ्यांदा दिल्लीत विजेतेपद पटकाविले; तसेच श्रीकांतविरुद्धच्या लढतीत 5-5 बरोबरीही साधली. 

मुंबई / नवी दिल्ली : किदांबी श्रीकांतचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. त्याला इंडिया ओपन स्पर्धेतील व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेनविरुद्धच्या अंतिम लढतीत रविवारी दोन गेममध्येच हार पत्करावी लागली. माजी जगज्जेत्या ऍक्‍सेलसेन याला दुसऱ्या गेममध्ये दिलेली लढत हीच श्रीकांतसाठी जमेची बाब ठरली. 

खाशाबा जाधव बंदिस्त सभागृहात श्रीकांतला प्रोत्साहित करण्यासाठी चाहत्यांनी चांगली गर्दी केली होती; पण श्रीकांतचे दिल्लीत दुसऱ्यांदा जिंकण्याचे स्वप्न उद्‌ध्वस्त झाले. त्याला 36 मिनिटे चाललेल्या निर्णायक लढतीत 7-21, 20-22 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याचा डिसेंबर 2017 पासूनचा आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. या विजयामुळे ऍक्‍सेलसेनने दुसऱ्यांदा दिल्लीत विजेतेपद पटकाविले; तसेच श्रीकांतविरुद्धच्या लढतीत 5-5 बरोबरीही साधली. 

गुणफलक सर्वच चित्र दाखवत नाही. दुसऱ्या गेममध्ये 20-20 बरोबरी होती. या वेळी ऍक्‍सेलसेनचा ताकदवान स्मॅश नेटला लागून श्रीकांतच्या भागात आला, त्या वेळी त्याला शटल परतवण्याचीही संधी नव्हती. मात्र, ऍक्‍सेलसेनने आपण विजेते आहोत, हे ताकदवान स्मॅशने सामना संपवताना दाखवले. 

पहिल्या गेममध्ये श्रीकांत जणू अपेक्षांच्या दडपणाखाली चुका करीत असल्याचे दिसत होते. त्याला 7-9 ते 7-21 ही पिछाडी अवघ्या 12 मिनिटांत सहन करावी लागली. ऍक्‍सेलसेन त्याला कोर्टच्या मागे नेत होता आणि पुढील भागात ड्रॉप्स करीत गुण घेत होता. श्रीकांतचा सदोष खेळ त्याचे काम सोपे करीत होता. 

ऍक्‍सेलसेनने दुसऱ्या गेममध्ये 5-1 आघाडी घेतली, त्या वेळी हा गेम किती मिनिटांत संपणार, अशीच चर्चा सुरू झाली; पण श्रीकांतने शटल जास्तीत जास्त कोर्टवर ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या दीर्घ रॅलीजनी चित्र बदलू लागले. श्रीकांतने 14-13 आघाडी घेत चाहत्यांचा उत्साहही वाढवला. ऍक्‍सेलसेन हार मानण्यास तयार नव्हता. त्याच्या फसव्या रॅलीजनी श्रीकांतकडून चुका होण्यास सुरवात झाली, तरीही श्रीकांतने 20-18 आघाडी घेतली. त्याच वेळी श्रीकांतचा अवे शॉट आणि ऍक्‍सेलसेनच्या स्मॅशमुळे बरोबरी झाली. पण, नंतर ऍक्‍सेलसेनने सलग दोन गुण घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

पहिल्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्यास दिलेल्या संधी दुसऱ्या गेममध्ये टाळण्यात यश मिळवले. माझी सुरवातही काहीशी संथ झाली होती. दुसऱ्या गेमपासून त्याची आक्रमकता रोखू शकलो. मोक्‍याच्या वेळी तो शांतपणे खेळला आणि जिंकला. 
या स्पर्धेतील एकंदरीत कामगिरीबाबत मी समाधानी आहे. 
- किदांबी श्रीकांत 

या कोर्टवर दोन्ही बाजूस खेळण्यात फरक आहे. श्रीकांतने दुसरा गेम जिंकला असता, तर काहीही घडले असते. श्रीकांतने मला डेन्मार्क ओपनमध्ये हरवले होते. आता मी याची परतफेड इंडिया ओपनमध्ये केली. कदाचित आगामी डेन्मार्क स्पर्धेत मी जिंकेन आणि इंडिया ओपन स्पर्धेत श्रीकांत. 
- व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन

संबंधित बातम्या