स्त्री विरुद्ध पुरुष वाद अन्‌ टेनिसमधील प्रॉब्लेम 

मुकुंद पोतदार
Monday, 26 November 2018

खेळ एकच असला तरी वेगवेगळ्या युगात खेळलेल्या खेळाडूंची तुलना करू नये, असे नेहमीच म्हटले जाते. याचे कारण काळागणिक खेळाचा दर्जा, हवामान-परिस्थितीपासूनचे संदर्भ, खेळाच्या साहित्याचा दर्जा-त्यातील आधुनिकता असे सारे काही बदलत असते. यानंतरही वेगवेगळ्या दशकातीलच नव्हे तर शतकातील चॅंपीयन्सची तुलना केली जाते. 

खेळ एकच असला तरी वेगवेगळ्या युगात खेळलेल्या खेळाडूंची तुलना करू नये, असे नेहमीच म्हटले जाते. याचे कारण काळागणिक खेळाचा दर्जा, हवामान-परिस्थितीपासूनचे संदर्भ, खेळाच्या साहित्याचा दर्जा-त्यातील आधुनिकता असे सारे काही बदलत असते. यानंतरही वेगवेगळ्या दशकातीलच नव्हे तर शतकातील चॅंपीयन्सची तुलना केली जाते. 

लॉन टेनिसच्या खेळात मात्र वेगळाच प्रॉब्लेम आहे. इथे महिला आणि पुरुष टेनिसपटूंना समान बक्षीस रक्कम मिळावी का इथपासून एखादा पुरुष टेनिसपटू महिलांना हरविण्याची भाषा करतो, तर काही महिला टेनिसपटू आम्ही पुरुषांना हरवून दाखवू असे म्हणतात. अशी विधाने होतात तेव्हा साहजिकच वाद होतो. टेनिसमध्ये अशा वादाचा इतिहासच आहे. 

यात नुकतीच भर पडली आहे. जॉन मॅकेन्रो यांनी म्हटले आहे की, योग्य पद्धतीने थोडा जरी सराव केला तरी सेरेना विल्यम्सला हरवू शकेन. 

जॉन मॅकेन्रो पुढील वर्षी 16 फेब्रुवारी रोजी 60 वर्षांचे होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष होण्याच्या कित्येक वर्षे आधी मॅकेन्रोना ऑफर दिली होती. सेरेना किंवा व्हिनसविरुद्ध खेळण्यासाठी काही रक्कम देऊ केली होती, पण मॅकेन्रो तेव्हा नाही म्हणाले होते. तेव्हा सुद्धा मॅकेन्रो असेच विस्कळीत बोलले होते. ती गोष्ट कित्येक वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मला जी ऑफर होती तो आकडा आता दहा लाख डॉलरच्या घरात गेला असता. तुम्हाला चलनवाढीचा दर माहिती आहे, असे ते म्हणाले होते. 

आता सुद्धा मॅकेन्रो म्हणतात की, तसे पाहिले तर मला सेरेनाविरुद्ध खेळायचे आहे असे नव्हे, पण मलाच दरवेळी विचारणा होते. इतरांना का नाही..? मला तरी कळत नाही. जा, दुसऱ्या कुणाला पण विचारा, मग कुणी का असेना तो... 

या वादाची आणखी एक बाजू म्हणजे सेरेना आणि व्हिनस यांनी 20 वर्षांपूर्वी असेच विधान केले होते. आम्ही पुरुष खेळाडूंविरुद्ध खेळू शकतो आणि हरवू शकतो. 

मॅकेन्रो याचा संदर्भ देतात. विल्यम्स भगिनींनी जे काही यश मिळविले आहे ते त्यांचा दर्जा दाखविण्यास पुरेसे आहे. त्यासाठी पुरुष खेळाडूंना हरवू शकतो असे विधान करण्याची गरज नाही. पण टेनिसमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. मॅकेन्रो यांनी त्यात पूर्वीही भर टाकली आहे. विल्यम्स भगिनी पुरुषांच्या रॅंकींगमध्ये पहिल्या 700 जणांमध्ये येण्यासही झगडतील, असे त्यांनी अलिकडेच म्हटले होते. त्यावरूनही वाद झाला होता. त्यानंतर सेरेनाने प्रत्यूत्तर दिले होते. मॅकेन्रो यांना आपल्याविषयी विधाने करू नयेत. आपल्या वक्तव्यात माझा संदर्भ देऊ नये. त्यांची विधाने वस्तुस्थितीवर आधारलेली नसतात, असे सेरेना म्हणाली होती. 
आता जर आपल्याला सेरेनाविरुद्ध खेळायते किंवा तिला हरवायचे नाही असे ते म्हणत असतील तर त्यांनी ठामपणे त्यास नकार द्यायला हवा होता, पण मग वाद कसा होणार... 

पुरुषाविरुद्ध जिंकली महिला 
महिला टेनिसपटू श्रेष्ठ की पुरुष टेनिसपटू असा वाद होऊन 1973 मध्ये प्रत्यक्ष कोर्टवर लढत झाली. त्यात बीली-जीन किंग यांनी बॉबी रिग्जला हरविले होते. 

गलेलठ्ठ, आळशी डुकरीणी... 
महिला टेनिसपटूंवरील खालच्या पातळीवरील टीका किंवा त्यांना चॅलेंज देण्याबाबतचा इतिहास कटू असाच आहे. 1992च्या विंबल्डनमध्ये नेदरलॅंड्‌सचा टेनिसपटू रिचर्ड क्रॅज्जेक याच्याइतकी खालची पातळी मात्र त्याआधी आणि त्यानंतर कुणी गाठलेली नाही. 

Fat, Lazy Pigs असा उल्लेख रिचर्डने केला होता. तेव्हा तो म्हणाला होता की, 80 टक्के महिला टेनिसपटू या गलेलठ्ठ, आळशी डुकरीणी आहेत. 
त्याच्या या विधानानंतर खळबळ उडाली. तेव्हा मात्र रिचर्डने घुमजाव केले, खरे तर त्याने शेपूट घातले असे म्हणणे योग्य ठरेल. 80 टक्के नव्हे तर 75 टक्के असे म्हणाल्याचा दावा त्याने केला. आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असा आरोपही त्याने केला. 

महिला टेनिसमध्ये पॉवरगेमची मुहुर्तमेढ रोवलेल्या मार्टिना नवरातिलोवाने रिचर्डला चपखल चपराक दिली. रिचर्डला बेशुद्ध पडेपर्यंत बडवून काढेन, असे विधान तिने केले. मग तिचे पुढचे वाक्‍य होते, मी तर जोक करीत होते. वास्तविक रिचर्ड हा सहा फुट पाच इंच उंचीचा टेनिसपटू झंझावाती सर्व्हिससाठी प्रसिद्ध होता. तेव्हा त्याची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. नंतर त्याने 1996 मध्ये विंबल्डन जिंकले. अर्थात त्यामुळे त्याचा विधानाचे समर्थन होत नाही.

मॅकेन्रो यांच्या आताच्या विधानाकडेही याचदृष्टिने पाहावे लागेल. आपली इच्छाही नाही, पण सराव केला तर हरवू असे म्हणून महिला टेनिसपटूंविषयी आपल्याला काय वाटते हेच ते स्पष्टपणे दाखवून देतात. स्त्री विरुद्ध पुरुष वादाचा टेनिसमधील प्रॉब्लेम मात्र सुटता सुटणार नाही हेच खरे. 
 

संबंधित बातम्या