जीवनज्योत यांच्या 'द्रोणाचार्य'साठी 'अर्जुनां'चे तीर 

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

जीवनज्योत यांच्यापेक्षा त्यांचे शिष्य जास्त नाराज आहेत. "आम्ही पुरस्कार देण्यासाठी विनंती करू शकतो, त्याव्यतिरिक्त आमच्या हातात काय आहे. जे काही घडले ते चुकीचे आहे. आम्ही क्रीडामंत्र्यांची भेट घेणार आहोत. अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे म्हणणेच सरकार ऐकून घेणार नसेल, तर या पुरस्काराचा अर्थच काय,' अशी विचारणा अभिषेक वर्माने केली. 

मुंबई : भारतीय कम्पाउंड तिरंदाजीच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या जीवनज्योत सिंग तेजा यांना शिफारशीनंतरही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने द्रोणाचार्य पुरस्कार नाकारला आहे. त्यांना पुरस्कार मिळावा, यासाठी आता अभिषेक वर्मा, व्ही. ज्योती सुरेखा आणि रजत चौहान या अर्जुनवीरांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे, त्याचबरोबर केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

तीन वर्षांपूर्वी कोरियातील विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या वेळी महिला तिरंदाज संघ ब्रॉंझपदकाच्या लढतीसाठी वेळेवर पोचला नव्हता. त्याबद्दल जीवनज्योत यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. आता याच कारणास्तव जीवनज्योत यांना पुरस्कार नाकारण्यात आला आहे. 

पाच वर्षांपूर्वी कम्पाउंड संघ आशियात पंधरावा होता. आज आपण जगात दुसरे आहोत. महिला संघ जागतिक क्रमवारीत दुसरा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन्ही संघांनी पदक जिंकले. कम्पाउंडमध्ये सातत्याने यश मिळत आहे. मी घडवलेल्या तिरंदाजांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे, असे जीवनज्योत यांनी सांगितले. 

जीवनज्योत यांच्यापेक्षा त्यांचे शिष्य जास्त नाराज आहेत. "आम्ही पुरस्कार देण्यासाठी विनंती करू शकतो, त्याव्यतिरिक्त आमच्या हातात काय आहे. जे काही घडले ते चुकीचे आहे. आम्ही क्रीडामंत्र्यांची भेट घेणार आहोत. अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे म्हणणेच सरकार ऐकून घेणार नसेल, तर या पुरस्काराचा अर्थच काय,' अशी विचारणा अभिषेक वर्माने केली. 

आता मी कधीही पुरस्कारासाठी अर्ज करणार नाही. त्यांना द्यावासा वाटला, तर ते देतील. सहा वर्षे कुटुंबाचा विचार न करता राष्ट्रीय शिबिरात सतत आहे. सर्व काही दिले आहे. गतवर्षीच्या अन्यायाबद्दलचे प्रकरण न्यायालयात आहे. आताही न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहे. 
- जीवनज्योत सिंग 

पुरस्कार मिळवण्यासाठी अजून काय करायला हवे. त्यांनी भारताला कम्पाउंड तिरंदाजीत ताकद दिली आहे. अनेकांचे यापूर्वी फारशी कामगिरी नसतानाही कौतुक झाले आहे आणि सरांसारख्या मार्गदर्शकांना पुरस्कार दिला जात नाही. त्यांना पुरस्कार नाकारला, तर त्याचे तिरंदाजीवरच प्रतिकूल परिणाम होतील. 
- अभिषेक वर्मा, भारतीय तिरंदाज. 

नाराजीचा सूर कायम 
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कितीही सुरळीत करण्याचे प्रयत्न केले, तरी ते जाहीर झाल्यानंतर वाद होतच आहेत. या वेळी "खेल रत्न'साठी वगळण्यात आल्यानंतर बजरंग पुनियाने न्यायालयात जाण्याची तयारी बोलून दाखवली होती. मात्र, त्यापूर्वी तो उद्या क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेणार आहे. त्याचवेळी तीन वेळ जगज्जेतेपद, पाचवेळा "सार्क' विजेतेपद अशा आंतरराष्ट्रीय पदकांसह कारकिर्दीत आतापर्यंत 115 पदके मिळविणारा पुण्याचा कॅरमपटू योगेश परदेशी हा देखील पुन्हा "अर्जुन' पुरस्कारापासून वंचित राहिला आहे. त्याच्या पत्नीने या संदर्भात क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना पत्र पाठवून आणखी काय करायला हवे याबाबत विचारणा केली आहे. 

संबंधित बातम्या