इरफान ठरला टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र झालेला पहिला भारतीय खेळाडू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 March 2019

पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर के. टी. इरफानने नाओमी (जपान) येथे झालेल्या चालण्याच्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकची पात्रता मिळविली. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला. त्याचप्रमाणे तो यंदा दोहा येथे होणाऱ्या विश्‍व अजिंक्‍यपदक स्पर्धेसाठीही पात्र ठरला. 

नागपूर : पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर के. टी. इरफानने नाओमी (जपान) येथे झालेल्या चालण्याच्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकची पात्रता मिळविली. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला. त्याचप्रमाणे तो यंदा दोहा येथे होणाऱ्या विश्‍व अजिंक्‍यपदक स्पर्धेसाठीही पात्र ठरला. 

लंडन ऑलिंपिकमध्ये दहावे स्थान मिळविणाऱ्या 29 वर्षीय इरफानने 1 तास 20 मिनिटे 57 सेकंदांत शर्यत पूर्ण करून ऑलिंपिकसाठी असलेली 1 तास 21 मिनिटांची पात्रता पार केली. चालणे आणि मॅरेथॉनसाठीची पात्रता 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. अन्य दोन भारतीय देवेंदर सिंग आणि के. गणपती यांना ऑलिंपिकची पात्रता गाठता आली नसली तरी, त्यांनी विश्‍व अजिंक्‍यपदक स्पर्धेची पात्रता पार केली. देवेंदरने 1 तास 21 मिनिटे 22 आणि गणपतीने 1 तास 22 मिनिटे 12 सेकंद वेळ देत दोहासाठी असलेली 1 तास 22 मिनिटे 30 सेकंदांची पात्रता पार केली. 

महिलांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सौम्या बेबीने चौथे स्थान मिळविले. मात्र, तिला दोन्ही स्पर्धेची पात्रता गाठण्यात अपयश आले. महिलांसाठी 1 तास 31 मिनिटे अशी ऑलिंपिक, तर 1 तास 33 मिनिटे 30 सेकंद अशी जागतिक स्पर्धेसाठीची पात्रता वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. सौम्या या दोन्ही वेळेपासून दूर राहिली. 

संबंधित बातम्या