World Cup 2019 : 'वर्ल्ड कप' तोंडावर आलाय अन् कोहली शोधतोय एक चांगला फलंदाज!

ज्ञानेश भुरे
Friday, 15 March 2019

भारतीय संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकासाठी, अष्टपैलू खेळाडूच्या जागेसाठी आणि राखीव यष्टिरक्षक अशा खेळाडूंचा शोध घेत होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजांची कामगिरी लक्षात घेता नक्कीच हा प्रश्‍न सुटलेला नाही. चौथ्या क्रमांकासाठी हर तऱ्हेने खेळाडू जोखण्याचे प्रयत्न झाले. अगदी विराट कोहलीनेही चौथ्या क्रमांकावर येऊन पाहिले. पण, हाती काहीच लागलेले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेकडे भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ आणि निवड समिती विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दृष्टिने निवड चाचणी म्हणून पाहत होते. अर्थात, सुरवातीपासून पंधरा जणांचा संघ निवडताना 11 खेळाडू निश्‍चित मानले जात होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपल्याला हार पत्करावी लागली. सहाजिकच विश्‍वकरंडक स्पर्धेच्या संघ रचनेविषयी दबक्‍या आवाजात चर्चा सुरू झाली. थेट बोलण्यास कुणीच तयार नव्हते. अशा वेळी चौथा सामना हरल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने संघ निश्‍चित आहे, एखाद दुसरा बदल होऊ शकतो असे सांगितले. कर्णधाराकडून संघ निश्‍चित असल्याचे सुतोवाच मिळाले असले, तरी त्याने शक्‍यता वर्तविलेला एखाद दुसरा बदल कोणता ही चर्चा रंगली नाही तर नवल. 

भारतीय संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकासाठी, अष्टपैलू खेळाडूच्या जागेसाठी आणि राखीव यष्टिरक्षक अशा खेळाडूंचा शोध घेत होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजांची कामगिरी लक्षात घेता नक्कीच हा प्रश्‍न सुटलेला नाही. चौथ्या क्रमांकासाठी हर तऱ्हेने खेळाडू जोखण्याचे प्रयत्न झाले. अगदी विराट कोहलीनेही चौथ्या क्रमांकावर येऊन पाहिले. पण, हाती काहीच लागलेले नाही. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतला ही संधी होती. त्याने ती दवडली. 

चौथ्या क्रमांकाचा विचार आणि इंग्लंडमधील वातावरण लक्षात घेता निवड समिती नक्कीच या जागेसाठी सातत्य दाखवणाऱ्या खेळाडूचा आग्रह धरणार यात शंका नाही. कर्णधार विराट कोहली हा देखील सातत्याचा हट्ट सोडणार नाही. त्यामुळे विश्‍वकरंडकासाठी चौथ्या क्रमांकावर कोण हे संघ निवड जाहीर होईपर्यंत गुलदस्त्यात राहणार असेच वाटते.

सलामीसाठी सध्या तरी रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीत काही बदल होईल असे वाटत नाही. कोहली त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर निश्‍चित असेल. आता चौथ्या क्रमांकावर अंबाती रायुडू, रिषभ पंत, लोकेश राहुल, विजय शंकर अशा चार फलंदाजांचा विचार होऊ शकतो. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्याच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. पंड्याच्या समावेशामुळे गोलंदाजीच्या आघाडीवर देखील मजबूती येईल, असे कोहलीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भुवनेश्‍वर, जसप्रीत बुमरा, महंमद शमी (पोलिस केस निकाली लागण्यावर अवलंबून), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल अशा गोलंदाजीच्या फळीत बदल होऊ शकणार नाही. कर्णधार विराट कोहली याने संघ निश्‍चित असल्याचे केलेल्या सुतोवाचामुळे आता संघात केवळ ही एकच जागा शिल्लक असेल यात दुमत नसावे. यष्टिरक्षण करण्यास महेंद्रसिंह धोनी समर्थ आहे. राहिला त्याच्या बॅक-अपचा प्रश्‍न. चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न योग्य सोडविल्यास तो प्रश्‍नही सुटू शकेल. कारण, शर्यतीत असणाऱ्या चौघांत राहुल आणि पंत हे यष्टिरक्षक आहेत. 

गेल्या काही मालिकेत अंबाती रायुडू प्रभाव पाडत होता. मात्र, विश्‍वकरंडक स्पर्धा जवळ आल्याचे दडपण त्याच्यावर आले की काय ? असे वाटण्या इतकी त्याची कामगिरी खालावली आहे. अंबाती रायुडू इतक्‍यात एकदिवसीय सामन्यात प्रभाव पाडू लागला होता. तोपर्यंत त्याची झलक ही टी 20 क्रिकेटमध्ये अधिक दिसली होती. त्यामुळे या झटपट क्रिकेटच्या जाळ्यात रायुडूला बसवताना पूर्ण विचार करावा लागणार आहे. रायुडूला आपल्या कामगिरीत ते सातत्य दाखवता आले नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या तीन सामन्यात त्याला वगळावे लागले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलला अजमावून पाहिले गेले. त्याने फलंदाजी केली खरी, पण तो पूर्वीचा राहुल दिसून आलेला नाही. त्याच्या फलंदाजी सफाईदारपणा आहे यात शंका नाही. ही सफाई अलिकडे दिसून आलेली नाही. कसोटी क्रिकेटबरोबर त्याने झटपट क्रिकेटशी चांगले जुळवून घेतले आहे. राहुल यष्टिरक्षण करू शकतो हा मुद्दा विचारात घेतल्यास रायुडूपेक्षा त्याचे पारडे जड राहू शकते. 

धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे बघितले जाऊ लागले. त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता झटपट क्रिकेटमध्ये उपयुक्त ठरू शकते, हे कितीही खरे असले, तरी यष्टिमागे काय ? हा प्रश्‍न आहेच. पंत यष्टिरक्षक म्हणून फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तर नाहीच नाही. फलंदाजीचा धडाका सुरू केला की त्याला कुठे थांबायचे हे कळत नाही. त्यामुळे पंत सुटला, सुटला असे म्हणत असताना तो कधी बाद होतो कधीच कळत नाही. त्यामुळे पंतची निवड करताना निवड समिती सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. 

यानंतर विचार होईल विजय शंकर. तमिळनाडूचा हा गुणी खेळाडू गेल्या काही मालिकेत आपली चमक दाखवतोयं. आयपीएलची देन असे त्याच्या आगमनाविषयी बोलले जाते. नक्कीच, आयपीएलमुळे हा खेळाडू उदयास आला. आपली उंची आणि ताकद याचा वापर करून विजय वेगवान आणि आक्रमक फलंदाजी करू शकतो हे त्याने गरज पडली तेव्हा दाखवून दिले आहे. त्याच्याकडून भलेही मोठी खेळी झालेली नाही. पण, त्याने प्रभाव पाडला हे नक्की आहे. विजयची निवड करताना त्याच्यातील गोलंदाजाकडे देखील बघितले जाईल. याच आघाडीवर मात्र तो प्रभाव पाडू शकलेला नाही. नाही म्हणायला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये विजय मिळविताना त्याने टाकलेले षटक नक्कीच लक्षात राहिल. 

या चार खेळाडूंनंतरही आणखी एका खेळाडूचा विचार व्हावा असे राहून राहून वाटते. हा खेळाडू म्हणजे अजिंक्‍य रहाणे. मधल्या फळीत खेळण्याची क्षमता, इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव यामुळे भरवशाच्या अशा चौथ्या क्रमांकावर रहाणेसारखा गुणी खेळाडू असावा असे वाटते. फलंदाजीचा दर्जा आणि दरारा असलेला हा गुणी फलंदाज आहे. त्याचा बॅडपॅच चालू आहे हे जरी खरे असले, तरी रहाणेसारख्या फलंदाजाचा बॅड पॅच एका छोट्या खेळीने सुटू शकतो. रहाणे हा फलंदाज नक्कीच विश्‍वास ठेवण्यासारखा आहे आणि गरज पडले तर तो सलामीला देखील खेळू शकतो हे विसरता येणार नाही. 

असो, हे सगळे आपले अंदाज. निर्णय घेण्यास कोहली आणि निवड समिती समर्थ आहेत. विश्‍वकरंडकासाठी संघात स्थान मिळेल अशी एकच जागा आहे आणि त्यासाठी चर्चेत असलेले चार आणि चर्चे बाहेरचा एक खेळाडू आहे. यातून विश्‍वकरंडकासाठी 'तो' नशिबवान कोण ? याच्या उत्तरासाठी संघ जाहीर होण्याची वाट पाहावी लागेल. 

संबंधित बातम्या