Asia Cup 2018 : भारत 'सातवे आसमॉं' पर?  आशिया करंडक सातव्यांदा जिंकण्याची संधी 

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती दिलेले सर्व पाच खेळाडू अंतिम सामन्यासाठी परततील; मात्र दिनेश कार्तिकऐवजी के. एल. राहुल असा बदल संभवतो आहे, तर पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवलेल्या बांगलादेश संघात उद्या बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. बांगलादेशविरुद्ध भारताची बाजू भक्कम असली, तरी तो संघ धोकादायक आहे, याची जाणीव भारतीयांना आहे.

दुबई : आशिया करंडकाचा मुकुट परिधान करण्यासाठी भारत फेव्हरिट आहे. त्यासाठी आव्हान पाकिस्तानऐवजी बांगलादेशचे असणार आहे. याच बांगलादेशला दोन वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली पराभूत करून भारताने विजेतेपद मिळवले होते, तेव्ही ती स्पर्धा ट्‌वेन्टी-20ची होती. आता रोहित शर्माने विजेतेपदाचा करंडक उंचावला, तर ते भारताचे सातवे आशिया विजेतेपद असेल. 

कमालीच्या उष्ण वातावरणात होत असलेल्या या स्पर्धेत भारताने अपराजित मालिका कायम ठेवली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. तेव्हा अंतिम मुकाबल्यासाठी सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशला खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्‍न भेडसावत आहे. स्पर्धेच्या सलामीला तमिम इक्‍बाल आणि कालच्या सामन्यापूर्वी शकीब अल हसन बाद झाले आहेत. 

साखळी सामन्यात बांगलादेशला सहज पराभूत केलेले असल्यामुळेही भारताचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. स्पर्धेत केलेल्या कामगिरीत सातत्य ठेवले, तरी भारताला विजेतेपदाची सर्वाधिक पसंती असेल. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकता आला नसला, तरी त्या सामन्यातून भारताच्या कमजोर बाजू समोर आल्या होत्या. यात सुधारणा करण्यासाठी दोन दिवसही मिळाले. फलंदाजीत डीआरएसचा वापर किती काळजीपूर्वक करायचा हे के. एल. राहुलच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांत संघ व्यवस्थापनाने डीआरएसची शाळाही घेतली असेल. 

अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती दिलेले सर्व पाच खेळाडू अंतिम सामन्यासाठी परततील; मात्र दिनेश कार्तिकऐवजी के. एल. राहुल असा बदल संभवतो आहे, तर पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवलेल्या बांगलादेश संघात उद्या बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. बांगलादेशविरुद्ध भारताची बाजू भक्कम असली, तरी तो संघ धोकादायक आहे, याची जाणीव भारतीयांना आहे. शिवाय दुबईतील स्टेडियमची खेळपट्टी आता फिरकीस साथ देऊ लागलेली आहे. शकीब नसला तरी बांगलादेशकडे चांगले फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागेल. 

संबंधित बातम्या