ग्रां.प्री. ऍथलेटिक्‍स : हिमा दासला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था
Saturday, 2 March 2019

चारशे मीटरप्रमाणे महिलांच्या आठशे मीटर शर्यतीवरही सर्वांच्या नजरा होत्या. पी. टी. उषाची शिष्या जिस्ना मॅथ्यू हिने चारशेऐवजी आठशे मीटरवर लक्ष्य केंद्रित केल्याने ही शर्यत चुरशीची झाली. पदार्पणात तिने सुवर्णपदक जिंकले होते. येथे तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले.

नागपूर : ज्युनिअर विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रत्येक क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेल्या हिमा दासकडून भविष्यात आणखी चमकदार कामगिरीची अपेक्षा असली, तरी तिला शनिवारी संगरूर (पंजाब) येथे झालेल्या तिसऱ्या भारतीय ग्रांप्री ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत पराभवाचा धक्का बसला. 

या स्पर्धेत महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत सर्वांच्या नजरा होत्या. कारण यंदा बारावीची परीक्षा दिल्यानंतर हिमा दास प्रथमच देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होत होती. विश्‍व ज्युनिअर स्पर्धेनंतर राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीमुळे हिमा दास विजय मिळवेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, पहिल्या ग्रांप्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या व्ही. के. विस्मय्याने सर्वांना चकीत केले आणि 53.80 सेकंदांत बाजी मारली. विस्मयाचा जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या रिले संघात समावेश होता. अनुभवी पुवम्माने रौप्य; तर उत्तर प्रदेशच्या प्राचीने ब्रॉंझपदक जिंकले. शेवटच्या दीडशे मीटरमध्ये वेग वाढवून प्रतिस्पर्ध्याला मागे टाकणे यासाठी हिमा ओळखली जाते. यात हिमा येथे अपयशी ठरली. तिला 55.19 सेकंदांच्या संथ वेळेसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एप्रिल महिन्यात दोहा येथे आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होत आहे. त्यासाठी चारशे मीटरमध्ये भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी तिला पतियाळा येथे 15 मार्चपासून होणाऱ्या फेडरेशन करंडक स्पर्धेत शेवटची संधी आहे. 

चारशे मीटरप्रमाणे महिलांच्या आठशे मीटर शर्यतीवरही सर्वांच्या नजरा होत्या. पी. टी. उषाची शिष्या जिस्ना मॅथ्यू हिने चारशेऐवजी आठशे मीटरवर लक्ष्य केंद्रित केल्याने ही शर्यत चुरशीची झाली. पदार्पणात तिने सुवर्णपदक जिंकले होते. येथे तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीच्या शालू चौधरीने 2 मिनिटे 08.69 सेकंदांत सुवर्ण; तर महाराष्ट्राच्या अर्चना अढावने 2 मिनिटे 09.43 सेकंदांत रौप्य जिंकले. 

संबंधित बातम्या