केदार जाधवने जपले सामाजिक भान; दुष्काळग्रस्तांना मदत

सुनंदन लेले
Thursday, 8 November 2018

‘‘क्रिकेट खेळण्याकरता फिरत असलो तरी माझी नजर महाराष्ट्रात काय चालू असते यावर कायम असते. यंदा उस्मानाबादला खूप कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याकरता प्रयत्न करत असलेल्या शिवार संसद संस्थेला मी मदत करताना फार मोठे काम केले असे मला अजिबात वाटत नाही. कर्तव्य भावनेतून मी मदत केलेली नाही. मला शेतकर्‍यांविषयी आस्था असल्याने मी मनापासून हे केले आहे’’, केदार म्हणाला.  

पुणे : खूप दिवसांनी दिवाळी कुटुंबासमावेत साजरी करायला मिळाल्यावर केदार जाधव खूश होता. दिवाळीचा आनंद कुटंबासमावेत साजरा करताना भारतीय संघाचा ऑल राऊंडर केदार जाधवने सामाजिक भान जपले आहे ही खास बात मानावी लागेल. केदारने दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांकरता काम करणार्‍या शिवार संसद या सामाजिक संस्थेला गत वर्षी शेतकरी मेळावा भरवण्याकरता आर्थिक पाठबळ दिले होते. त्याच शिवार संसदला चालू मोसमात घसघशीत आर्थिक मदत केदार जाधवने आपणहून देऊ केली आहे.

‘‘क्रिकेट खेळण्याकरता फिरत असलो तरी माझी नजर महाराष्ट्रात काय चालू असते यावर कायम असते. यंदा उस्मानाबादला खूप कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याकरता प्रयत्न करत असलेल्या शिवार संसद संस्थेला मी मदत करताना फार मोठे काम केले असे मला अजिबात वाटत नाही. कर्तव्य भावनेतून मी मदत केलेली नाही. मला शेतकर्‍यांविषयी आस्था असल्याने मी मनापासून हे केले आहे’’, केदार म्हणाला.  

केदार जाधव एकदिवसीय संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. 5 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह मैदानात उतरताना जी उणीव जाणवते ती केदार जाधवने ऑल राऊंडर नात्याने भरून काढतो. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला केदारच्या योगदानाची जाणीव असल्याने संघ व्यवस्थापन केदारची जपणूक करत आहे. केदारला मांडीची दुखापत झाल्यावर संघ व्यवस्थापन काळजीत पडले होते. आता पुढील तीन महिन्यात केदारला ऑस्ट्रेलियातील 3 न्युझीलंडमधील 5 आणि भारतात ऑस्ट्रेलियन संघासमोरच्या 5 एकदिवसीय सामन्यात सहभागी करून घेऊन विश्वकरंडकाची तयारी पूर्ण करायचा संघ व्यवस्थापनाचा पक्का विचार आहे. साहजिकच केदार जाधवच्या तंदुरुस्तीकडे काटेकोर लक्ष पुरवले जात आहे. 

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाला एक दिवसीय मालिका खेळायला जाण्याअगोदर केदार जाधव महाराष्ट्राच्या संघाकडून रणजी सामने खेळणार आहे.

संबंधित बातम्या