विंडीजविरुद्धच्या मालिकेतही कोहलीस विश्रांती? 

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

इसेक्‍सकडून खेळताना मुरली विजयला सूर गवसला आहे, त्यामुळे त्याला पसंती मिळेल असे वाटत होते; पण निवड समिती त्याच्याऐवजी मयांक अगरवालला पसंती देण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर शिखर धवनला संघाबाहेर ठेवत पृथ्वी शॉच्या समावेशाचाही विचार होत आहे. 

मुंबई/ नवी दिल्ली : वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नवोदितांना जास्त प्रमाणावर संधी देण्याचा विचार निवड समिती करीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी नवोदितांची चाचणी करण्याची ही अखेरची संधी आहे. त्यामुळेच आशिया कप स्पर्धेतील अंतिम लढत होईपर्यंत संघनिवडीची घोषणा लांबणीवर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

इसेक्‍सकडून खेळताना मुरली विजयला सूर गवसला आहे, त्यामुळे त्याला पसंती मिळेल असे वाटत होते; पण निवड समिती त्याच्याऐवजी मयांक अगरवालला पसंती देण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर शिखर धवनला संघाबाहेर ठेवत पृथ्वी शॉच्या समावेशाचाही विचार होत आहे. 

निवड समिती आगामी भरगच्च मोसम पाहून विराट कोहलीला जास्त विश्रांती देण्यासही तयार आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप कोहलीने घेतला नसल्याचे समजते. आशिया कपपाठोपाठ वेस्ट इंडीजविरुद्धही कोहली न खेळल्यास त्याचा फटका टीव्ही प्रक्षेपकांना बसेल; मात्र भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी याबाबत जास्त बोलण्यास तयार नाहीत. त्यांनी याबाबत कोहलीच्या मतास जास्त महत्त्व असेल असे सांगितले. मधल्या फळीत अध्यक्षीय संघाचे नेतृत्व करणारा करुण नायर, हनुमा विहारी हेही मधल्या फळीतील निवडीच्या स्पर्धेत आहेत. 

अश्‍विन अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन त्याला तसेच इशांत शर्माला घाईघाईने खेळवण्याची तयारी नाही. रवींद्र जडेजा तसेच कुलदीप यादवची निवड निश्‍चित आहे. तिसऱ्या फिरकी गोलंदाजासाठी जयंत यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यात प्रमुख स्पर्धा आहे; पण हजारे स्पर्धेत जागतिक विक्रम केलेला शाहबाज नदीम हा डार्क हॉर्स आहे. 

संबंधित बातम्या