'आयपीएल'मध्येच मला शिकायला मिळाले : खलिल अहमद 

वृत्तसंस्था
Wednesday, 7 November 2018

विंडीज संघाच्या फलंदाजीचे तारणहार सलेल्या शई होप आणि शिमरन हेटमेयर यांना बाद करून त्याने कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. खलिल म्हणाला, ""भुवनेश्‍वरच्या साथीत नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी मिळाली याचाच आनंद मला झाला आहे.

लखनौ : विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा वेगवान गोलंदाज खलिल अहमद याला नवा चेंडू टाकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आणि ती त्याने पार पाडली. "कर्णधाराने दिलेली जबाबदारी पार पाडल्याचे समाधान आहे,' अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

विंडीज संघाच्या फलंदाजीचे तारणहार सलेल्या शई होप आणि शिमरन हेटमेयर यांना बाद करून त्याने कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. खलिल म्हणाला, ""भुवनेश्‍वरच्या साथीत नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी मिळाली याचाच आनंद मला झाला आहे. कुठल्याही दडपणाशिवाय ती पार पाडू शकलो, याचे समाधानदेखील आहे. देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते आणि आता स्वप्नच पूर्ण झाले नाही, तर कसोटीस उतरलो हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. दडपण घेतले असते, तर अशी कामगिरी दाखवू शकलो नसतो.'' 

खलिलने आशिया करंडक स्पर्धेतच आपली छाप पाडली होती. मात्र, विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा संधी मिळाल्यावर त्याचे त्याने सोने केले. मालिकेत त्याने चार सामन्यात सात गडी बाद केले. खलिलने या साऱ्या यशाचे श्रेय "आयपीएल'ला दिले. तो म्हणाला, ""आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव खूप परिणामकारक होता. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर ड्रेसिंगरूम शेअर करायला मिळाल्याचा मोठा फरक पडला. चुका कशा सुधारायच्या हे "आयपीएल'मध्येच मला शिकायला मिळाले. त्यामुळे भारताकडून खेळताना आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याच दडपण आले नाही.'' 

संबंधित बातम्या