Asia Cup 2018 : भारताने सातत्य राखणे गरजेचे : गावसकर

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

कर्णधार रोहित आणि धवन यांनी झंझावाती सुरवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांतच ते प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण करीत आहेत. या दोघा सलामीवीरांनी आपल्या भात्यातील फटके मारत स्टॅंड दणाणून सोडली आहेत. त्यांनी एकमेकांच्या तोडीस तोड फटकेबाजी केली.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी होईल असे बहुसंख्य लोकांना वाटले नव्हते किंवा त्यांना तशी अपेक्षा नव्हती. अर्थात बांगलादेश ही मजल मारण्यास पूर्णपणे योग्य आहे यात शंका नाही. त्यांना कमी लेखल्यास भारतालाही धक्का बसू शकेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवातून सावरत बांगलादेशने उसळी घेतली. यातून संघ म्हणून त्यांचा निर्धार आणि जिगर दिसून आली. त्यांनी उत्तम समन्वय राखला. 'उपांत्य फेरी'त पाकिस्तानविरुद्ध त्यांनी अत्यंत सकारात्मक खेळ केला. त्यामुळे अंतिम फेरीच्या शर्यतीत चॅंपियन्स करंडक विजेता पाक संघ पार पिछाडीवर पडला. 

मश्रफी मोर्तझाने संघाचे नेतृत्व अप्रतिम पद्धतीने केले आहे. त्याची क्षेत्ररचना आणि गोलंदाजीतील बदलांना संघाने शक्‍य तेवढा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुशफीकूर चमकदार खेळ करतो आहे. मिथुनच्या साथीत त्याने केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेश सहजी प्रयत्न सोडून देणार नसल्याचे दिसून आले. मुशफीकूरचे यथार्थ ठरेल असे शतक मात्र हुकले. 

मश्रफीने मग नेतृत्वगुण प्रदर्शित केले. त्याने ऑफस्पीनर मेहदी हसन याला नवा चेंडू दिला. त्यामुळे फखर झमानचा अडथळा दूर झाला. सामना प्रतिस्पर्ध्याच्या आवाक्‍याबाहेर नेण्याची क्षमता फखरकडे आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याचा फॉर्म खराब राहिला. परिणामी पाकला चांगली सलामी कधीच मिळाली नाही. 
याच आघाडीवर भारत चांगली कामगिरी बजावतो आहे. कर्णधार रोहित आणि धवन यांनी झंझावाती सुरवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांतच ते प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण करीत आहेत. या दोघा सलामीवीरांनी आपल्या भात्यातील फटके मारत स्टॅंड दणाणून सोडली आहेत. त्यांनी एकमेकांच्या तोडीस तोड फटकेबाजी केली. गोलंदाजी तुच्छ लेखत त्यांनी मारलेले फटके श्‍वास रोखून धरायला लावत होते आणि हे निव्वळ नेत्रदीपक दृश्‍य होते. 

भारतीय फिरकी गोलंदाजांनी संथ खेळपट्ट्यांचा परिणामकारक वापर केला आहे. डावाच्या मध्यास ते प्रतिस्पर्ध्याच्या मध्य फळीची नाकेबंदी करीत आहेत. ते चांगली भागीदारी होऊ देत नाहीत. बुमराचा मारासुद्धा चमकदार आहे. नोबॉल पडू नयेत म्हणून त्याने अत्यंत विचारपूर्वक रन-अपमध्ये फेरबदल केला आहे. त्यामुळे त्याचा फ्रंट फूट क्रीझला जेमतेम स्पर्श करतो. यातून त्याची शिकण्याची आणि पूर्वीच्या चुका सुधारण्याची इच्छा दिसून येते. जडेजा आणि चहल यांनीसुद्धा बुमरापासून बोध घ्यायला हवा आणि नोबॉल पडता कामा नयेत याची खबरदारी घ्यावी. भारताचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होत आहे. अंतिम फेरीत शैलीत प्रवेश केलेल्या संघाला ते साजेसे आहे. आता आशिया करंडक राखण्यासाठी आणखी एक दिवस असाच चुरशीचा खेळ होईल यासाठी भारताने सातत्य राखणे गरजेचे आहे. 
 

संबंधित बातम्या