Asia Cup 2018 : बांगलादेश भारताला पराभवाचा धक्का देणार..?

सुनंदन लेले
Thursday, 27 September 2018

शुक्रवारी आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान रंगणार असला तरी प्रेक्षक, संयोजकांपासून ते टीव्ही प्रक्षेपणाचे हक्कं विकत घेतलेल्या चॅनल्सपर्यंत सगळ्यांना अंतिम सामना भारत वि पाकिस्तान होणार नसल्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. 

दुबई : आशिया कप स्पर्धेतील निकालांचे धक्के शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत संपले नाहीत. श्रीलंकेच्या संघाला सुरुवातीला पराभूत होऊन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. आणि बुधवारी बांगलादेश संघाने पाकिस्तानला पराभूत करून भारताविरुद्ध अंतिम सामना खेळायची जागा नक्की केली. शुक्रवारी आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान रंगणार असला तरी प्रेक्षक, संयोजकांपासून ते टीव्ही प्रक्षेपणाचे हक्कं विकत घेतलेल्या चॅनल्सपर्यंत सगळ्यांना अंतिम सामना भारत वि पाकिस्तान होणार नसल्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. 

पाकिस्तानी संघाच्या कमालीच्या कुचकामी खेळाने आशिया कप स्पर्धेतील झळाळी कमी झाली आहे. संयोजकांनी भारत वि पाकिस्तान सामना तीन वेळा होईल अशी योजना बनवली होती. त्यातील पहिला सामना मुद्दाम रविवारी भरवण्यात आला जेणे करून भारतीय टीव्ही प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक होईल असे बघितले गेले. अंतिम सामना स्थानिक सुट्टीचा विचार करून शुक्रवारी नियोजित केला गेला. या सर्व योजनांना पाकिस्तान संघाने मातीत मिळवले आहे. 

दुसर्‍या बाजूला बांगलादेश संघाचे कौतुक करावेच लागेल. तमीम इक्बाल आणि आता शकीब अल हसन या दोन प्रमुख खेळाडूंना दुखापत होऊनही बांगलादेश संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यशाचे मुख्य श्रेय मुश्फीकूर रहीमला द्यावे लागेल. प्रत्येक मोलाच्या सामन्यात मुश्फीकूरने दर्जेदार फलंदाजी केली आहे. मोठ्या खेळ्या खेळताना गरम हवेने प्रचंड दमलेल्या मुश्फीकूरला भारतासमोरच्या अंतिम सामन्याकरता तंदुरुस्त करायला बांगलादेश संघ व्यवस्थापन धडपडत आहे. 

तसे बघायला गेले तर भारतीय संघाला अंतिम फेरीत सर्वांगीण खेळ करून बांगलादेश संघाला पराभूत करणे अशक्य नाहीये. भारताचे रोहित शर्मा आणि शिखर धवन जबरदस्त फॉर्ममधे आहेत. अंबाती रायुडुने मिळालेल्या संधीचा मस्त फायदा घेत चांगली फलंदाजी करून दाखवली आहे. गोलंदाजीत बुमरा- भुवनेश्वरची जोडी आणि फिरकीत चहल- कुलदीपची जोडी झकास कामगिरी करत आहे. बांगलादेश संघ सामन्यात वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करणार नाही. भारतीय संघाने चुका केल्या तर त्याचा फायदा घेत दडपण वाढवायची योजना ते आखतील. भारतीय संघाला असा खेळ करावा लागेल की समोरच्या संघाला सामन्यात मुसंडी मारायची संधीच ठेवायची नाही. अंतिम सामन्याकरता संघ निवडताना दिनेश कार्तिकच्या जागी लोकेश राहुलला संधी द्यायची का नाही हा एकच विचार भारतीय कर्णधाराला करावा लागेल.

दुबई स्टेडियम वरील खेळपट्टी फार मोठी जादू दाखवणार नाही. मुख्यत्वे करून फलंदाजांचे लाड करताना गोलंदाजांकरता आव्हाने निर्माण करणारी खेळपट्टी अंतिम सामन्याकरता तयार केली जात आहे. भारत वि पाकिस्तान सामन्याच्या अपेक्षेने स्थानिक लोकांनी शुक्रवारच्या सामन्याची महागडी तिकिटे विकत घेतली आहेत. त्यातील पाकिस्तानी पाठीराख्यांना फार मोठ्या निराशेला तोंड द्यावे लागत आहे. बरेच पाकिस्तानी पाठीराखे अंतिम सामन्यातील रस निघून गेला म्हणत हातातील तिकिटे विकायला तयार झाले आहेत. दुसरीकडे बांगलादेशी प्रेक्षक आपल्या संघाला आवाजी पाठिंबा द्यायला तिकिटे विकत घ्यायला पुढे सरसावत आहेत.

संबंधित बातम्या