निवृत्तीचा अजून विचार नाही : पेस 

वृत्तसंस्था
Monday, 22 October 2018

 टेनिस खेळण्याचा आनंद अजूनही घेत असल्यामुळे निवृत्तीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले. 

मुंबई : टेनिस खेळण्याचा आनंद अजूनही घेत असल्यामुळे निवृत्तीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले. 

मी आणखी किती खेळणार, या वर्षअखेरीस निवृत्त होणार का, यापैकी कुठल्याच प्रश्‍नाचे उत्तर माझ्याकडे नाही. हे वर्ष संपेल तेव्हा मी विचार करेन. अजून तरी खेळण्याचा आनंद घेत आहे, असे पेस म्हणाला. 
आपल्या टेनिस कारकिर्दीविषयी बोलताना पेस म्हणाला, ""टेनिसमध्ये जे मिळवायचे होते ते मी मिळविले आहे. त्यामुळे मला नव्याने काही सिद्ध करायचे आहे, असे मला वाटत नाही. इतकी वर्षे जे टेनिस मी खेळत आलो आहे, त्यावर माझे प्रेम आहे. टेनिसचा आनंद अजूनही घेत आहे, त्यामुळे मी खेळत आहे. गेली काही वर्षे कठीण जात आहेत; पण टेनिसने माझ्या आयुष्यात खूप समाधानाचे दिवस आणले.'' 

बदलत्या डेव्हिस करंडक स्पर्धेच्या स्वरूपाविषयी देखील पेसने आपली मते स्पष्ट पणे मांडली, तो म्हणाला, ""डेव्हिस करंडक स्पर्धा लोकप्रिय करण्यासाठी खूप वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. टेनिसमधील अव्वल खेळाडूंनी या स्पर्धेत खेळावे यासाठी त्यांचे प्रयत्न अजून सुरू आहेत. नव्या स्वरूपात त्यांनी हाच विचार नव्याने केला आहे. त्यासाठी त्यांनी स्पर्धा एका आठवड्यात खेळविण्याचा प्रयत्न केला आहे. तो मला फारसा रुचलेला नाही. कारण या वेळी घरच्या कोर्टवर खेळण्याचा फायदा मिळणार नाही. एकाच देशात ही स्पर्धा होणार असल्याने या स्पर्धेची लोकप्रियता त्या एकाच देशापुरती मर्यादित राहणार आहे.'' 

डेव्हिस करंडक ही एक पारंपरिक स्पर्धा आहे. यात देशासाठी खेळण्याचा मान खेळाडूला लाभतो. त्यामुळे डेव्हिस करंडक स्पर्धा जगभर प्रचलित करण्याचा हा मार्ग बरोबर वाटत नाही. अनेक खेळाडूंचा या नव्या स्वरूपाला विरोध असेल. 
- लिएँडर पेस 

संबंधित बातम्या