World Cup 2019 : हारला.. बाहेर गेला.. तरीही लढला अन् कार्तिक अखेर 'वर्ल्ड कप'ला निघाला!

मुकुंद पोतदार
Monday, 15 April 2019

वयाच्या 22व्या वर्षी 12 वर्षांपूर्वी ज्याची संधी थोडक्‍यात हुकली तो कार्तिक 34व्या वर्षी किती उपयुक्त ठरणार हा मुद्दा होता. निवड समितीने त्याच्या सरस कौशल्यास प्राधान्य दिले.

वर्ल्ड कप 2019 :  दिनेश कार्तिकला वर्ल्ड कपसाठी निवडले नाही तर भारताने मूर्खपणा केलेला असेल. तो चार नंबरवरही चांगला पर्याय ठरेल. डीके हा मी पाहिलेल्या बेस्ट फिनिशर्समध्ये आहे. केकेआरसाठी तर त्याने अविश्वसनीय अशी कामगिरी केली आहे. 
- जॅक्‍स कॅलीस 

केकेआरचा मुख्य प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक्‍स कॅलीस याने भारतीय संघनिवडीच्या तीन दिवस आधी हे वक्तव्य केले होते. तेव्हा दुसरा यष्टिरक्षक म्हणून कार्तिकचे नाव मागे पडून दिल्लीच्या रिषभ पंत याला पसंती मिळत होती. 2007च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड झालेल्या, पण एकही सामना खेळायला न मिळालेल्या कार्तिकला यावेळी संधी मिळणार का यावरून बरीच चर्चा झडत होती. 

वयाच्या 22व्या वर्षी 12 वर्षांपूर्वी ज्याची संधी थोडक्‍यात हुकली तो कार्तिक 34व्या वर्षी किती उपयुक्त ठरणार हा मुद्दा होता. निवड समितीने त्याच्या सरस कौशल्यास प्राधान्य दिले. याशिवाय पंतच्या तुलनेत प्रतिष्ठेच्या सामन्यांत दडपणाखाली खेळण्याचा सरस अनुभव हा सुद्धा कार्तिकचा प्लसपॉईंट ठरला. 

ज्या कार्तिकने 5 सप्टेंबर 2004 रोजी इंग्लंडविरुद्ध लॉर्डसला पदार्पण केले, त्या कार्तिकसाठी स्वप्नवत पदार्पणानंतर स्वप्नपूर्ती नव्हे तर स्वप्नभंगच वाट्याला आला. 2004 मध्ये त्याचे वन-डे पदार्पण झाले, पण त्याच वर्षी 23 डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध चितगावला महेंद्रसिंह धोनीने पदार्पण केले. त्यानंतर धोनीने आगेकूच केली, तर कार्तिकची पीछेहाट झाली. यानंतरही कार्तिकला 91 सामन्यांत संधी मिळाली आहे. या कालावधीत 2007चा वर्ल्ड कप त्याच्यासह भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला होता. 2011 व 2015 अशा दोन्ही स्पर्धांसाठी त्याची निवड झाली नव्हती. अशावेळी कार्तिकने संयमाने स्थानिक क्रिकेटसह आयपीएलमध्येही सातत्याने खेळणे सुरू ठेवले. 

2008 व 2013 अशा दोन वेळा त्याने पुनरागमन केले, पण दोन्ही वेळा त्याला सातत्याअभावी वगळावे लागले. वन-डे पदार्पणात लॉर्डसवर मायकेल वॉन याला चपळाईने यष्टीचीत केलेल्या कार्तिकची निवड चर्चेचा विषय ठरली होती. याचे कारण त्याला पार्थिव पटेल याच्याऐवजी पसंती मिळाली होती. हाच कार्तिक कसोटीत मात्र चालू शकला नाही. दरम्यानच्या काळात धोनी युग सुरू झाले. परिणामी कार्तिकची प्रतीक्षा लांबत गेली. 

गेल्या वर्षी आयपीएलमधील कामगिरी महत्त्वाची ठरली. केकेआरचा मालक शाहरुख खान याने गेल्या मोसमात गौतम गंभीरला हटवून कार्तिककडे कर्णधारपदाची धुरा सोपविली. केकेआरने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. एलिमीनेटरमध्ये केकेआरने राजस्थान रॉयल्सला हरविले, तर क्वालीफायर 2 मध्ये त्यांचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव झाला. या कामगिरीमुळे अनुभव कार्तिकसाठी पुनरागमनाचे दरवाजे खुले झाले. 

कार्तिकसमोरील आव्हान मात्र सोपे नसेल. मुख्य म्हणजे विश्वकरंडक पदार्पणाचा त्याचा मार्ग सुद्धा सोपा नसेल. न्यूझीलंड दौऱ्यातील टी-20 मालिकेत न्यूझीलंड दौऱ्यातील टी-20 मालिकेत भारताला पराभूत व्हावे लागले. हॅमिल्टनमधील निर्णायक तिसऱ्या सामन्यात कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव नाकारली. त्यावेळी निम्मे अंतर धावत आलेल्या कृणाल पंड्याला त्याने परत पाठविले. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना आणि समोर टीम साऊदी याच्यासारखा भेदक वेगवान गोलंदाज असताना त्याने हे करणे धक्कादायक ठरले होते. त्या षटकात एक वाइड पडूनही आणि कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचूनही भारताला चार धावांनी पराभूत व्हावे लागले. 

त्या सामन्यानंतर कार्तिकवर पुन्हा दडपण आले होते, पण अखेरीस आयपीएलनेच त्याला तारले. दरम्यानच्या काळात कार्तिकची करारबद्ध खेळाडूंत पदावनती, तर पंतची बढती झाली होती. विश्वकरंडकाची संघनिवड जवळ आल्यानंतर मात्र पंत यष्टिरक्षणात चुका करीत असताना कार्तिकने ही जबाबदारी चोखपणे पार पाडली. संयमाचे फळ अखेर त्याला मिळाले. दिड दशकांच्या कारकिर्दीत 91 सामने खेळलेल्या कार्तिकची वाटचाल तुकड्या तुकड्यांतच झाली आहे. त्यातील लेटेस्ट तुकडा त्याच्यासाठी फलदायी ठरणार का, अंतिम संघनिवडीत त्याचा अनुभव बलस्थान ठरणार का, प्लेईंग 11 मध्ये त्याला स्थान मिळणार का यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागेल. 

संबंधित बातम्या