Asia Cup 2018 : शोएब मलिकची आवड भारतच; अर्धशतकी खेळी

सुनंदन लेले
Sunday, 23 September 2018

दोघांची शतकी भागीदारी झाली होती आणि मोठे फटके मारायची वेळ तोंडावर आली असताना सर्फराझला बाद करून कुलदीप यादवने भागीदारी तोडली. नव्याने फलंदाजीला आलेल्या असीफ अलीबद्दल पाकिस्तानी पत्रकार खूप चांगले का बोलतात हे लगेच दिसले.

दुबई : शोएब मलिकने कर्णधार सर्फराज अहमद बरोबर केलेल्या शतकी भागीदारीने पाकिस्तानला संघाला बर्‍यापैकी चांगली धावसंख्या उभारून दिली. अनुभवाचा फरक कसा पडतो हे दोन फलंदाजांच्या खेळातून दिसून आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांअखेरीला पाकिस्तानने 7 बाद 236  धावा उभारल्या. फारशी जान नसलेल्या खेळपट्टीवर विजयाकरता 237 धावांचा पाठलाग करणे भारतीय फलंदाजांकरता अशक्य नक्कीच नाहीये.

सर्फराझ अहमदने प्रथम फलंदाजी करायचा घेतलेला निर्णय अपेक्षित होता. इमाम उल हक आणि फकर झमानने गेल्या सामन्यात केलेल्या चुका टाळल्या. दोघांनी डावाच्या सुरुवातीला मोठे फटके मारायची घाई केली नाही. इमाम पायचित झाला तेव्हा मैदानावरील पंचांनी नाबाद असल्याचा निर्णय दिला होता. धोनीने तिसर्‍या पंचांकडे दाद मागायचा सल्ला दिला जो योग्य ठरला. फकर झमानने एक उत्तुंग षटकार मारून तीस धावांची मजल गाठली. कुलदीप यादवला स्वीपचा फटका मारताना फकर झमान पायचित झाला. पाठोपाठ चांगली फलंदाजी करणारा बाबर आझम धावबाद झाला. 3 बाद 58 धावसंख्येवर पाकिस्तान संघ अडचणीत आला असताना शोएब मलिक - सर्फराझची जोडी मैदानात जमली. 

जम बसवायला थोडा वेळ घेतल्यावर दोघांनी पळून धावा काढण्याचा सपाटा लावला. धावफलक हलता ठेवण्यात दोघांना यश आले. शोएब मलिक झोकात फलंदाजी करत होता. दोन षटकार मारताना त्याने ताकदीपेक्षा टायमिंगवर विश्वास ठेवला होता. लागोपाठ दुसर्‍या सामन्यात अर्धशतक ठोकणार्‍या शोएब मलिकच्या खेळीवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या आशा होत्या. समोर खेळणारा सर्फराज मुख्यत्वे करून एकेरी धावा काढून शोएबला मलिकाला खेळायची संधी देत होता.

दोघांची शतकी भागीदारी झाली होती आणि मोठे फटके मारायची वेळ तोंडावर आली असताना सर्फराझला बाद करून कुलदीप यादवने भागीदारी तोडली. नव्याने फलंदाजीला आलेल्या असीफ अलीबद्दल पाकिस्तानी पत्रकार खूप चांगले का बोलतात हे लगेच दिसले. असीफ अलीने भुवनेश्वर कुमारला दोन तगडे षटकार मारून धावगतीला वेग दिला. 78 धावांची सुंदर खेळी करणार्‍या शोएब मलिकची विकेट नशिबाने मिळाली. बुमराने डाव्या यष्टीबाहेर टाकलेल्या चेंडूवर फ्लीकचा फटका मारताना मलिकचा उडालेला झेल धोनीने बरोबर पकडला. लगेच 30 धावांची आकर्षक खेळी करणार्‍या असीफला चहलने गुगली टाकून बोल्ड केले.

50 षटकांचा खेळ संपताना पाकिस्तानने 7 बाद 236 धावा उभारल्या होत्या. भारताकडून बुमरा, चहल-कुलदीप यादव फिरकी जोडीने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. 

संबंधित बातम्या