महाराष्ट्र कबड्डीसाठी धोक्‍याची घंटा?

राजू भावसार
Sunday, 14 April 2019

कबड्डी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक मराठी माणसाची कबड्डीशी नाळ जोडलीय.

कबड्डी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक मराठी माणसाची कबड्डीशी नाळ जोडलीय. हे नाते खूप जुने व खास आहे. कबड्डीचा जन्म, त्यानंतर झालेली वेगवेगळी स्थित्यंतरे ते आजची आधुनिक कबड्डी या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत मोठी व महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षांत भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघात महाराष्ट्राचे खेळाडू शोधावे लागतात, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हेच प्रो कबड्डीबाबतही घडणार का, अशी भीती निर्माण व्हावी ही परिस्थिती आहे. प्रो कबड्डीत राज्यातील दोन संघ असूनही दोन संघांत मिळून जेवढे खेळाडू असतील, तेवढेच या स्पर्धेत आहेत ही नक्कीच चिंतेची बाब आहे. 

- राजू भावसार

कबड्डी आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट आहे. खेळाच्या प्रगतीतही महाराष्ट्राचा वाटा मोलाचा आहे. खेळाचा दर्जा, त्यातील कौशल्ये व चुरस आणि त्याद्वारे खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी कबड्डीवर शास्त्रोक्त पद्धतीने संशोधन हे महाराष्ट्रातच झाले. नियमांमध्ये सुधारणा वा क्रीडांगणामधले बदल यावर महाराष्ट्रातील अभ्यासकांनीच प्रयोग केले. सर्व मोसमात इनडोअर कबड्डी खेळता यावी म्हणून पुण्यातील सन्मित्र संघाने १९६०-७० च्या दशकात खास जाड सतरंज्या बनवून घेतल्या व त्यावर सामने खेळवण्याचे प्रयोग केले. त्यातूनच कबड्डी मॅटवर खेळली जावी ही कल्पना पुढे आली व प्रचलित झाली. स्वतःची खास शैली असलेले असंख्य प्रतिभावान खेळाडूही याच मातीत जन्मले. त्यांच्या वैविध्यपूर्ण खेळाने इतर खेळांच्या स्पर्धेत कबड्डी केवळ टिकूनच नाही राहिली तर लोकप्रियही झाली; पण महाराष्ट्राच्या कबड्डीतील देदीप्यमान इतिहासास व परंपरेस गेल्या काही दशकात उतरती कळा लागली. पूर्वीप्रमाणे दर्जेदार खेळाडूंच्या निर्मितीचा ओघ आटला. याच काळात इतर राज्यांनी मुसंडी मारत प्रचंड प्रगती केली; पण महाराष्ट्राची खेळातील प्रगती झालीच नाही.

हरियानासारख्या राज्यांतून खेळाडूंचा अखंड स्त्रोत सुरू झाला. या सगळ्याची कारणमीमांसा करण्याची व त्याविषयी पावले उचलण्याची तसदी आपल्या राज्यकर्त्यांनी घेतली नाही. संघटना स्थापन करण्यापासून ते पुढेपर्यंत मोहन धारीया, शरद पवार, बुवा साळवी यांच्यासह अनेक दिग्गजांनी भारतीय कबड्डी महासंघात मोठी पदे भूषवत कबड्डीच्या विकासाची धुरा वाहिली; पण १९८५ नंतर तिथे एखाद्या प्रातिनिधिक पदावर समाधान मानत आपल्या त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत राहणे पसंत केले. कालांतराने कळत नकळत महाराष्ट्राचा क्रीडांगणाबरोबरच संघटनेतलाही दबदबा कमी होत गेला. 

दरम्यान, कबड्डीला सुगीचे दिवस आले. २०१४ साली आनंद महिंद्रा (हेही मुंबईचेच रहिवासी) तसेच चारू शर्मा यांच्या पुढाकाराने प्रो कबड्डी लीग सुरू झाली. या व्यावसायिक लीगने कबड्डीचे विश्‍व बदलून टाकले. स्टार स्पोर्टस्‌च्या अत्याधुनिक आणि कल्पक टीव्ही प्रक्षेपणाने क्रीडाविश्‍वात खळबळ माजवली. कबड्डीची जगभरात चर्चा होऊ लागली. खेळाडू लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. स्वप्नवत किमती लावून खेळाडूंचे लिलाव होऊ लागले. कबड्डीला संजीवनी मिळाली; पण महाराष्ट्र मात्र त्यात मागे पडला. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्यातून प्रो कबड्डी लीगमधे दोन संघ आहेत; पण या दोन्ही संघांमधे किती मराठी खेळाडू आहेत? राज्याच्या राजधानीच्या यू-मुम्बा संघात यंदा केवळ एक खेळाडू महाराष्ट्राचा आहे. त्याचवेळी हरियाना स्टीलर्स या हरियानाच्या संघात मात्र ९० टक्के खेळाडू स्थानिक आहेत. प्रो कबड्डीतील बऱ्याचशा संघांची कार्यालयेही मुंबईत आहेत; पण त्यांच्यावर प्रभाव पाडून महाराष्ट्रातील कबड्डीस त्याचा फायदा मिळवण्यात आपण अपयशी ठरलो. 

राज्यातील कबड्डीची लोकप्रियता वाढली. शालेय स्पर्धेतील कबड्डीचे संघ मोठ्या प्रमाणावर वाढले. नाही म्हणायला महाराष्ट्राच्या पुरुष संघाने २०१८ च्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवले; पण तरीही तो विजय महाराष्ट्र कबड्डीत नवचैतन्य आणू शकला नाही. त्यानंतरच्या ६६ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे होते. गतवर्षीच्या विजेतेपदाच्या पार्श्‍वभूमीवर साहजिकच संघाकडून खूप अपेक्षा होत्या. खेळाडूंची दमछाक करणारी दीर्घ कालावधीची प्रो लीग, त्यात त्यांना झालेल्या दुखापती इत्यादी कारणांमुळे महाराष्ट्राचा संघ विजेतेपदाचा दावेदार वाटलाच नाही; पण इतर संघांतील खेळाडूही याच परिस्थितीतून आले होते तरी त्यांच्या कामगिरीवर त्याचा इतका परिणाम दिसून आला नाही.

इतर राज्यांतील खेळाडूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील खेळाडूंच्या सलग विविध स्पर्धांमधील सहभागाचा विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर दिसून येतो. दुखापती वाढल्या आहेत आणि त्यावर उपचार करून पूर्णपणे रिकव्हर होण्यास पुरेसा कालावधी खेळाडूंना मिळत नाहीये.

प्रो कबड्डीतील संख्या घटली

या सर्वांचा परिणाम प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाच्या लिलावात दिसून आला. मराठी खेळाडूंचा प्रो लीगमधील सहभागाचा आकडा २०-२५ वरून १०-१२ वर आला. त्यांच्यासाठी बोली लावण्यास संघ कचरू लागले. २०१८ च्या राष्ट्रीय विजेतेपदानंतर वाढलेले मराठी खेळाडूंचे भाव घसरू लागले. २०१८ चा राष्ट्रीय विजेत्या संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगा व २०१९ च्या महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार गिरीश इरनक यांचे भाव जवळजवळ निम्म्यावर आले. विशाल माने, नीलेश साळुंके, विकास काळे, ऋतुराज कोरवी वगळता अन्य महाराष्ट्रीयन खेळाडूंना संघांनी म्हणावी तशी पसंती दाखवली नाही.

प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामापासून मैदान गाजवणारे कित्येक मराठी खेळाडू यंदाच्या सातव्या मोसमात दिसणार नाहीत. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो २०१४ च्या आशियाई स्पर्धेचा. सुवर्णपदक विजेता नितीन मदने, दुसऱ्या हंगामाचा सर्वोत्कृष्ट चढाईपटू काशिलिंग अडके, महाराष्ट्राचा माजी कर्णधार महेंद्र राजपूत, २०१८ ची राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा तुषार पाटील, सचिन शिंगाडे, नव्या दमाचे मयूर शिवतरकर व अक्षय जाधव यांचा. यामागे मुख्यत्वे या खेळाडूंना झालेल्या दुखापती व त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर असलेले प्रश्‍नचिन्ह हेच असावे असे वाटते. जर सहभागाची तुलनाच करायची झाली तर साधारण १५० ते २०० हरियानाचे खेळाडू कुठे आणि १०-१२ मराठी खेळाडू कुठे. 

सर्वाधिक स्पर्धा तरीही...

राष्ट्रीय संघात महाराष्ट्राचे खेळाडू दिसत नाहीत. आता प्रो कबड्डीतील संघही लिलावात महाराष्ट्रातील खेळाडूंना घ्यायला तयार होत नाहीत. याबाबत महाराष्ट्रातील कबड्डी संघटकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. खेळाडूंच्या उत्पत्तीबरोबरच त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सूत्रबद्ध प्रशिक्षण देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील प्रशिक्षक तसेच प्रशिक्षणाविषयी ही आढावा घेण्याची वेळ आली आहे.

देशात सर्वात जास्त नोंदणीकृत संघ महाराष्ट्रात आहेत, सर्वांत जास्त स्पर्धाही इथेच होतात. कबड्डीला करिअर बनवून त्याद्वारे रोजगार मिळवून देण्याची प्रथा महाराष्ट्राने देशभरात रुजवली. विविध जिल्ह्यांतील शेकडो संस्थांमध्ये प्रशिक्षक संघ उभारण्यासाठी राबताहेत; पण तरीही हवे तसे निकाल दिसत नाहीत. प्रो लीगच्या येत्या हंगामात जयपूर पिंक पॅंथर्स संघात सहायकपदी नेमणूक झालेले प्रताप शेट्टी हे महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षक आहेत.

दिग्गज प्रशिक्षकही मागे पडले

जागतिक विजेत्या भारतीय महिला संघाचे मार्गदर्शक रमेश भेंडीगिरी, अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे तसेच पंकज शिरसाट, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर बांदेकर, अनुभवी प्रकाश साळुंके, संजय मोकल यांच्यासह अनेक मार्गदर्शकांना प्रो कबड्डीच्या प्रवाहात आपली जागा टिकवण्यासाठी झगडावे लागले. नक्की कुठे कमी पडतोय आपण? सर्व काही असताना महाराष्ट्रातून हरियानासारखे खेळाडू का निर्माण होत नाहीयेत? प्रशिक्षण प्रणालीत बदल करणे गरजेचे आहे का? या सर्व बाबींवर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार अत्याधुनिक पद्धतीने येणाऱ्या पिढीस प्रशिक्षण दिले पाहिजे.

खेळातील कौशल्याबरोबर खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. प्रो लीगदरम्यान आशियाई स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक हिसकावून घेणाऱ्या इराणचे राष्ट्रीय प्रशिक्षक गोलाम रजा यांच्याशी जवळून संपर्क आला. त्यांच्यानुसार इराणी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू ४० टक्केही तंदुरुस्त नाहीयेत. गमतीचा भाग असा की प्रो लीगमधील बहुतेक संघांचे शारीरिक तंदुरुस्ती प्रशिक्षक मराठी आहेत. संघटक पुढील पिढीच्या तयारीसाठी त्यांची मदत घेतील का?

सिद्धार्थने शान राखली

या सर्वांमधे सिद्धार्थ देसाई या एका मराठी खेळाडूने मात्र आपले अभिमानास्पद स्थान निर्माण करत महाराष्ट्राची शान राखली. प्रो लिगच्या गेल्या हंगामाच्या सर्वोत्तम होतकरू खेळाडूला सातव्या हंगामासाठी तेलुगू टायटन्सने विक्रमी १ कोटी ४५ लाखांची बोली लावत आपल्या संघात सामील केले आहे. इतकेच नव्हे तर आपला दुखापतग्रस्त मोठा भाऊ सूरज यासही सिद्धार्थने आपल्या संघात स्थान मिळवून दिले.

प्रो कबड्डीच्या इतिहासात महाराष्ट्राचे दोन सख्खे भाऊ प्रथमच एकत्र खेळताना दिसतील. त्याचबरोबर पुणेरी पलटणने सुशांत साईल, शुभम शिंदे, असलम इनामदार, संकेत सावंत या महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंना संधी दिली आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा पुढील अध्याय लिहिण्याची मोठी जबाबदारी या मोजक्‍या खेळाडूंवर आली आहे. उभ्या महाराष्ट्राचे त्यांच्या कामगिरीवर लक्ष असेल.

संबंधित बातम्या