World Cup 2019 : रायुडू, असा नकोस स्वतःलाच गाडू

मुकुंद पोतदार
Wednesday, 17 April 2019

आता रनधुमाळीकडे वळूयात. इथे मात्र वर्ल्ड कपचा हातातोंडाशी आलेला लाडू हुकलेल्या, इंग्लंडचे तिकीट गमावलेल्या रायुडूने स्वतःच आपला पत्ता कट करून टाकल्याची दाट शक्यता आहे

वर्ल्ड कप 2019 :  आझम खान-अंबाती रायुडू आणि जयाप्रदा-एम. एस. के प्रसाद अशा जोड्या जुळवून काही लिहीण्याची वेळ येईल असे कालपर्यंत वाटले नव्हते. निवडणूकांच्या रुपातील रणधुमाळी आणि क्रिकेटच्या वर्ल्डकपची रनधुमाळी सुरु आहे. यातील न आणि ण वगळता दोन्ही आघाड्यांवर निर्माण झालेले वातावरण तापत आहे. त्यामुळेच अशी तुलना करण्याची वेळ आली आहे.

आधी आपण रणधुमाळीचा वेध घेऊयात. लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य असते. प्रत्येक जण आपले मत व्यक्त करू शकतो. सध्या भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. लोकशाह असल्याचा फायदा घेत व्यक्तीस्वातंत्र्याचा स्वैराचार माजला आहे. काही (खरे तर अनेक) राजकीय उमेदवारांचा तर तोल (आणखी) ढळतो आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांनी प्रतीस्पर्धी भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांच्या संदर्भात खाकी अंडरवेअर असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे बराच वाद पेटला. आझम युक्तीवाद करतना म्हणाले की, मला पुरुषांच्या संदर्भात म्हणायचे होते, म्हणूनच मी अंडरवेअर हा शब्द वापरला, जो जयाप्रदा यांना लागू होत नाही.

उत्तर प्रदेशातील ज्या मतदारसंघाच्या नावात राम आहे त्या रामपूरमध्ये इतके खालच्या पातळीवरील वक्तव्य झाले. अर्थात रणधुमाळी सुरु होते तेव्हा असा धुरळा उडतच असतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून लोकांनाही फार भरीव, उच्च अपेक्षा नसतात. याचे कारण Politics is the Last Resort of Scoundrel म्हणजे राजकारण हा बदमाशांचा शेवटचा आधार असतो ही थोर विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांची उक्ती सर्वांना ठाऊक असते.

आता राष्ट्रीय महिला आयोगाने आझम यांच्याकडून खुलासा मागविला आहे. आझम यांचे म्हणणे आहे की, मी एका पुरुषाबद्दल बोललो, ज्याचा असा दावा आहे की, त्याने दीडशे बंदुका आणल्या आहेत आणि मी दिसताच मला तो गोळी घालेल. त्या व्यक्तीने आरएसएसची-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पँट घातल्याचे उघड झाले आहे.

ज्या जयाप्रदा पूर्वी आझम यांच्याच पक्षात होत्या, त्या सत्तांतर केल्यानंतर आझम यांच्यासमोर किती आव्हान निर्माण करतील, रामपूर मतदारसंघात कुणाची सरशी होईल हे कळण्यास वाट पाहावी लागेल.

आता रनधुमाळीकडे वळूयात. इथे मात्र वर्ल्ड कपचा हातातोंडाशी आलेला लाडू हुकलेल्या, इंग्लंडचे तिकीट गमावलेल्या रायुडूने स्वतःच आपला पत्ता कट करून टाकल्याची दाट शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रायुडूला वगळले. नावालाच पार्टटाईम विकेटकीपर असलेला, गोलंदाजीवर बंदी आलेला, फलंदाज म्हणून स्ट्राईक रेट मंदावलेला रायुडू वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळवू शकला नाही. त्याच्या ऐवजी विजय शंकर याला पसंती मिळाली.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील बीसीसीआय मुख्यालयात प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत संघ जाहीर केला. रायुडूला वगळण्याबाबत ते म्हणाले की, आम्हाला विजय शंकर याच्या रुपाने सरस पर्याय मिळाला इतकेच. तो चांगला फलंदाज, उपयुक्त गोलंदाज व चपळ क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याकडे 3 Dimensional कौशल्य आहे.

प्रसाद यांच्या 3 डायमेन्शनच्या संदर्भाला सर्व वृत्तपत्रांनी ठळक प्रसिद्धी दिली. दिनेश कार्तिकच्या निवडीमुळे डावलला गेलेल्या रिषभ पंतला बरीच सहानुभूती मिळाली. त्या तुलनेत रायुडूला तेवढे समर्थक मिळाले नाहीत.

 अशावेळी रायुडूचा तोल 24 तासांनी ढळला. त्याने ट्वीट केले की, just ordered a new set of 3d glasses to watch the world cup
यानंतर रायुडूने डोळे मिचकावण्याच्या आणि छद्मी हास्य करण्याच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.

रायुडू याचा हा cross batted shot आहे. एरवी मैदानावर असे शॉट पाहायला बरीच मजा येते. असे शॉट सोशल मिडीयावर मारले गेले तर मग आणखी धुरळा उडतो. रायुडू याने प्रसाद यांच्या वक्तव्याची आणि पर्यायाने विजय शंकरच्या निवडीची खिल्ली उडविताना क्षणभर टाळ्याही मिळविल्या. त्याच्या ट्वीटवर बरेच रिप्लाय आले. त्यात काही जणांनी त्याला पाठिंबा दिला, तर काही जणांनी आपापल्या स्टाईलने सोशल मिडीयावर बॅटींग करून घेण्याची हौस भागवून घेतली.

कुणी राजकारणाचे, तर कुणी बॉलीवूडचे संदर्भ दिले. एकाने  लालकृष्ण अडवानी यांना फोटो पोस्ट केला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला. (रथयात्रांच्या माध्यमातून ज्या अडवानींनी भारतीय जनता पक्षाला फेमस केले त्यांना अमित शहा-नरेंद्र मोदी यांच्या निवड समितीने सायडींगला टाकले आहे. अर्थात अडवानींचे पक्षाच्या वाटचालीतील योगदान सर्वांना ठाऊक आहे.)

एका व्यक्तीने मुन्नाभाई एमबीसीएस चित्रपटातील संजय दत्त याच्या गाजलेल्या गाण्याचा संदर्भ दिला. त्याने फोटोशॉपगिरी करून संजय दत्तऐवजी रायुडूचा चेहरा लावला आणि वो रात अपून 2 बजे तक पिया असे ट्वीट पोस्ट केले.

अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा रायुडूच्या ट्वीटला 11953 रिट्विट आणि  73626 लाईक्स भेटले होते. अर्थात याचा अर्थ रायुडूचे ट्वीट हिट झाले असे नाही. रायुडूने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून टाकली आहे. त्यातच झटपट क्रिकेटसाठी त्याने वर्ल्ड कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची हातची सुवर्णसंधी मातीमोल करून टाकली होती. अशावेळी अशा ट्वीटने प्रसाद यांना -प्रसाद- देण्याचा उतावीळपणा त्याला भोवण्याचीच चिन्हे आहेत.

खरे तर रायुडूने जिद्दीने पुनरागमन करीत अनेक वेळा आपली जिगर दाखवून दिली होती, पण यावेळी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणून त्याने असे ट्वीट करणे सोशल मिडीयासाठी पोषक असले तरी वैयक्तिक पातळीवर त्याच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.

सोशल मिडीयावर गौतम गंभीर असा क्रॉस बॅटने ट्वीट करीत असतो, पण गंभीर हा 2011चा वर्ल्ड कप वीनर आहे. त्याची कारकिर्द होऊन गेली आहे. रायुडूचे मात्र तसे नाही, आता या ट्वीटनंतर त्याचे कसे होणार हे त्याचे त्याला माहित.

निवड समिती जेव्हा संघ जाहीर करते तेव्हा त्यांच्या पातळीवर सर्वोत्तम 15 खेळाडू निवड असते. त्यांची संघनिवड कुणाचेच शंभर टक्के समाधान करीतन नाही. हक्काचे स्थान मिळविले आणि तरिही वगळले असे दुर्दैव काही जणांच्या वाट्याला जरूर येते, पण जेव्हा ही मंडळी बॅटने नव्हे तर सोशल मिडीयावरील पोस्टने प्रत्यूत्तर देतात तेव्हा ते त्यांचे भविष्य हँग करीत असतात. 

रायुडूने संघातील स्थान भक्कम केले नव्हते. आयपीएल हा संघनिवडीचा निकष नसला तरी आतापर्यंत रायुडू चेपॉकवर चमकला नव्हता. त्यातच त्याने असे ट्वीट करून हिटविकेट होण्याचीही चुक केली आहे.

या रायुडूला आता टीम इंडियाचे दरवाजे खुले होतील असे वाटत नाही. मोहींदर उर्फ अमरनाथ हा निवड समितीला अनेक वेळा बंच ऑफ जोकर्स म्हणायचा, पण तो सुद्दा 1983च्या वर्ल्ड कपन वीनर आहे. वेगवान गोलंदाजीसमोर एकवेळी झगडणाऱ्या जिमीने नंतर जिद्दीने पुनरागमन केले होते. किंबहुना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेवाद्वितीय असा कमबॅक किंग आहे.

आता रायुडूने या ट्वीटमुळे अमरनाथ किंवा अगदी विजय शंकर यांच्यापासून बोध घेण्याची संधी घालवली आहे. कदाचीत ट्वीटवरील प्रतिक्रियांनुसार अडवानी किंवा संजय दत्त हेच त्याच्यासाठी आधार ठरतील, कारण भारतीय क्रिकेटच्या संदर्भात तो निराधार झाल्याचेच दिसते.

संबंधित बातम्या