'स्टुपिड शॉट्‌स'मुळे साईनाचा पराभव 

वृत्तसंस्था
Friday, 8 March 2019

सुरवातीच्या मोठ्या पिछाडीनंतर साईनाने चांगला प्रतिकार केला होता. तिने तईला बॅकलाइनच्या जवळ जाण्यास भाग पाडले; पण साईनाने आक्रमण सुरू केल्यावर तई तिच्या भात्यातील आगळे शॉट्‌स काढत साईनाला निरुत्तर करीत होती. अखेर साईनाचा तईविरुद्ध विजयाचा दुष्काळ सहाव्या वर्षीही कायम राहिला आहे. 

मुंबई, बर्मिंगहॅम : तुला सामना जिंकायचा असेल, तर शिस्तबद्ध खेळ हवा. तुझे काही शॉट्‌स स्टुपिड होते, अशा शब्दांत पारुपली कश्‍यपने साईना नेहवालची कानउघाडणी केली; पण तरीही साईना नेहवालचा खेळ अपेक्षित उंचावला नाही आणि तिला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तई झु यिंगविरुद्ध हार पत्करावी लागली. 

साईनाने तई झु यिंगविरुद्धच्या यापूर्वीच्या 12 लढतींत हार पत्करली आहे. आताही निकाल फारसा बदलला नाही. साईनाला 15-21, 19-21 हार पत्करावी लागली. साईना प्रतिस्पर्धीस वर्चस्वाची सातत्याने संधी देत असल्याने तिचा मार्गदर्शक म्हणून स्पर्धेसाठी आलेला कश्‍यप संतापला होता. पहिल्या गेममधील ब्रेकच्यावेळी साईना 3-11 मागे असताना त्याने तुझे काही शॉट्‌स स्टुपिड होते, असे सुनावले. पहिला गेम गमावल्यावर कश्‍यपने सुरवातीस गेमच्या शेवटी खेळतील तसा खेळ करायला हवा असे सांगितले. गेम मध्यात आल्यावर कश्‍यपने शटलवर नियंत्रण ठेव, शॉट्‌ससाठी प्रयत्न कर. सतत ड्रॉपला सामोरे जावे लागत आहे, ते करताना कोर्ट ओपन देतेस. तिला झटपट गुण जिंकायचे आहेत, तू तिला ते देऊ नकोस. तू शिस्तबद्ध खेळ करायला हवा. तिने स्ट्रोक्‍स करायला सुरवात केली, की तुला कोर्ट ओपन मिळेल, हे जमले नाही, तर अवघड आहे, अशा सूचनांची सरबत्ती केली. 

सुरवातीच्या मोठ्या पिछाडीनंतर साईनाने चांगला प्रतिकार केला होता. तिने तईला बॅकलाइनच्या जवळ जाण्यास भाग पाडले; पण साईनाने आक्रमण सुरू केल्यावर तई तिच्या भात्यातील आगळे शॉट्‌स काढत साईनाला निरुत्तर करीत होती. अखेर साईनाचा तईविरुद्ध विजयाचा दुष्काळ सहाव्या वर्षीही कायम राहिला आहे. 

पहिल्या गेममध्ये ब्रेकच्यावेळी कश्‍यपने कानउघाडणी केल्यावर साईनाने नऊपैकी आठ गुण जिंकले. मात्र कोंडीत पकडल्यावर तई जास्त आक्रमक होते हेच दिसले. दुसऱ्या गेममध्ये साईना 8-4, 12-8 वाटचाल करीत असताना तईने नेटजवळून झकास टच करीत साईनाला चुका करण्यास भाग पाडले. साईनाने हे टाळण्यासाठी शटल जास्तीत जास्त उंच मारले; पण तईने आपण यासही तयार आहोत हे दाखवले आणि फुलराणीचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद यंदाही स्वप्नच राहिले. 

संबंधित बातम्या