Asia Cup 2018 : अफगाणिस्तान ताठ मानेने मायदेशी परतणार

सुनंदन लेले
Wednesday, 26 September 2018

कितीही अडचणी असल्या तरी अफगाणिस्तानमधले क्रिकेट कधी मेले नाही. उलट क्रिकेटचे प्रेम वाढतच राहिले. याचा चांगला परिणाम असा झाला की राष्ट्रीय संघाची बांधणी करताना स्थानिक गुणवान खेळाडूंची कमतरता कधीच भासली नाही

दुबई : ‘‘आशिया कप स्पर्धेकरता संयुक्त अरब अमिरातीला येताना आमच्या मनात एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे स्पर्धेत नुसता सहभाग घ्यायचा नाही. सातत्याने चांगला खेळ करून ठसा उमटवायचा. मला वाटतं की माझ्या संघाने ते करून दाखवले आहे. आमच्यापेक्षा खूप अनुभवी संघांना आम्ही चांगला क्रिकेट खेळून टक्कर दिली’’, अफगाणिस्तानचा कप्तान असघर अफगाण म्हणत होता. त्याच्या बोलण्यात तथ्य होते कारण अफगाणिस्तान संघाने आशिया कप स्पर्धेत आपला वेगळा ठसा उमटवला.

पात्रता फेरीतून दाखल होत काही सामने खेळले असले तरी अफगाणिस्तान संघाला एक दिवसीय सामने खेळायची पूर्ण परवानगी डिसेंबर 2017 मध्ये मिळाली. या संघाबाबतची लक्षणीय बाब अशी होती की बाकीच्या नवख्या संघात अनिवासी परदेशी नागरिकांचा समावेश असतो. अफगाणिस्तानच्या संघातील सर्वच्या सर्व खेळाडू 100% स्थानिक होते. ‘‘आमच्या देशाला अनावश्यक युद्धाचे बरेच चटके सहन करावे लागले ज्याचा विपरीत परिणाम जनजीवनावर झाला. कितीही अडचणी असल्या तरी अफगाणिस्तानमधले क्रिकेट कधी मेले नाही. उलट क्रिकेटचे प्रेम वाढतच राहिले. याचा चांगला परिणाम असा झाला की राष्ट्रीय संघाची बांधणी करताना स्थानिक गुणवान खेळाडूंची कमतरता कधीच भासली नाही’’, राशिद खान सांगत होता.

आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी असे वाटत होते की अफगाणिस्तान संघ राशिद खान आणि मुजीबच्या फिरकीवर पूर्ण विसंबून आहे. साखळी सामन्यात या दोन दादा फिरकी गोलंदाजांनी ठसा उमटवला तरी फक्त त्यांच्यावर संघ विसंबून आहे असे दिसले नाही. साखळी स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंकन संघाला पराभवाचा झटका देत अफगाणिस्तान संघाने दिमाखात सुपर फोर साखळीत प्रवेश केला. सुपर फोरमध्ये खेळलेल्या तीन सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश संघाला शेवटच्या षटकापंर्यंत झुंजायला लावण्यात अफगाणिस्तानला यश आले. शेवटच्या सामन्यात भारतीय संघासोबतचा सामना बरोबरीत सोडवून अफगाणिस्तानने कमाल केली. ‘‘अफगाणिस्तान संघाने दाखवलेले सातत्य विस्मयकारक आणि कौतुकास्पद आहे. हा संघ 2019 वर्ल्डकप करता बाकीच्या संघांकरता धोक्याची घंटा आहे असे मला वाटते’’, अनिल कुंबळे म्हणाला. 

अफगाणिस्तानचा कप्तान असघर अफगाण म्हणाला, ‘‘आमचे सामने आबुधाबीला झाले ज्याचा मोठा तोटा झाला. दुबईची खेळपट्टी आमच्या खेळाला पोषक होती. एका अर्थाने आम्हांला भारतासमोरचा सोडून सगळे सामने आबुधाबीत खेळावे लागले हा अन्याय होता. पण मी संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. आमच्यातील गुणवत्ता चांगला खेळ सातत्याने करून दाखवून दिली. आता जगातील कोणताही संघ आम्हाला कमी लेखण्याची चूक करणार नाही’’, असघर म्हणाला.

अंतिम सामन्यात खेळणार नसला तरी अफगाणिस्तानचा संघ ताठ मानेने आशिया कप स्पर्धेतून मायदेशी रवाना होतो आहे.

संबंधित बातम्या