World Cup 2019 : ऑस्ट्रेलिया संपली असं आता म्हणाल तर बघाच!

वृत्तसंस्था
Thursday, 14 March 2019

भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीनंतर 3-2 असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची मानसिकता आणि तयारीच एकप्रकारे दाखवून दिली, असा इशाराच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने सहभागी देशांना दिला. 

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीनंतर 3-2 असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची मानसिकता आणि तयारीच एकप्रकारे दाखवून दिली, असा इशाराच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने सहभागी देशांना दिला. 

निलंबित स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जखमी जोश हेझलवूड, मिशेल स्टार्क या प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाने मिळविलेला विजय नक्कीच खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचाविणारा आहे. विश्‍वकरंडकासाठी आम्ही सज्ज आहोत. आमची दुसरी फळी आता स्थिरावत आहे, असे फिंच म्हणाला. 

प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत मिळविलेल्या या यशाचा मला अभिमानच वाटतो, असे सांगून फिंच म्हणाला, "भारताविरुद्ध भारतात खेळताना 0-2 अशा पिछाडीवरून मालिका जिंकणे नक्कीच सोपे नव्हते. पण, आम्ही ते करून दाखविले. ज्या पद्धतीने खेळाडूंनी खेळ केला; तो अभिमान वाटावा असाच आहे. मधल्या काही प्रसंगांनंतर आम्ही परिवर्तनाच्या प्रवाहातून जात होतो. मात्र, आता हा प्रवाह स्थिरावला असून, या विजयाने दुसऱ्या फळीतील खेळाडूंनाही आत्मविश्‍वास मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया संपली, अशी आमच्यावर टीका होत होती. मात्र, आता असे म्हणण्याचे कुणी धाडस करणार नाही.'' 

ऑस्ट्रेलिया संघ आता इथून संयुक्त अरब अमिरातीला रवाना होणार आहे. तेथे ते पाकिस्तानविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. 

ऑस्ट्रेलिया विशेष 
- 0-2 अशा पिछाडीवरून मालिका जिंकणारा ऑस्ट्रेलिया क्रिकेटविश्‍वातील चौथा संघ आणि पाचवा प्रसंग. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान या संघांनी अशी कामगिरी केली आहे. यात दक्षिण आफ्रिकेची दोन वेळी अशी कामगिरी 
- सलग सहा एकदिवसीय मालिकांमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला मालिका विजय 
- पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचे 14 बळी 
- भारताविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक 382 धावा फटकविणारा उस्मान ख्वाजा एकमेव फलंदाज 
- मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या कमिन्स, ऍडम झम्पा, जिये रिचर्डसन या तीन गोलंदाजांची 30 पेक्षा कमी सरासरी 
 

संबंधित बातम्या